नवी मुंबई, 21 मार्च (आ.प्र.) :
शहरातील बेवारस वाहनांबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन 10 ते 16 मार्च या कालावधीत 66 दुचाकी, 34 चारचाकी आणि 7 रिक्षा-टेम्पो अशी 107 विविध बेवारस वाहने उचलून नेली; तसेच 88 हजारांची दंडवसुली करण्यात आली. या मोहिमेबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नवी मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला, पदपथांवर बेवारस वाहने उभी असल्याने रस्ते व पदपथांची सफाई करणे शक्य होत नाही. काही वाहने अनेक दिवसांपासून उभी असल्याने त्यावर धूळ साचलेली आहे.
सुनियोजित व स्वच्छ शहर असा लौकिक असणाऱ्या नवी मुंबई शहर स्वच्छतेला त्यामुळे बाधा पोहोचते. याबाबत आयुक्तांनी आढावा बैठकीत बेवारस वाहनांवर कारवाईचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांच्यामार्फत आठही विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना बेवारस वाहनांवर कारवाईची सूचना देण्यात आली होती. विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रात रस्त्यांवर, पदपथांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या. या नोटिसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत ही वाहने टोइंगद्वारे उचलून कोपरखैरणे येथे नेण्यात आली.