कल्याण, 20 मार्च (आ.प्र.) :
महापारेषणच्या 220/22 केव्ही आनंदनगर उपकेंद्रातील तीनपैकी एका 50 एमव्हीए रोहित्राची क्षमता 100 एमव्हीए करण्याचे काम 11 मार्चला सकाळपासून हाती घेण्यात आले होते. अविरत काम करून अल्पावधीतच मंगळवारी रात्री (18 मार्च) क्षमतावाढ केलेले रोहित्र यशस्वीरित्या चार्ज करण्यात आले. बुधवारी दुपारी तीनला या रोहित्रातून वीजपुरवठ्याला सुरुवात झाली. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या वीजपुरवठ्याला यातून मोठा लाभ होणार आहे. याप्रसंगी महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा आणि महापारेषणचे मुख्य अभियंता महेश भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
विविध औद्योगिक संघटना व ग्राहक, महापारेषण आणि महावितरणच्या बैठकीत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे क्षमतावाढीचे काम सुरू करण्यात आले होते. 20 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अविरतपणे व युद्धस्तरावर काम करून नियोजित कालावधीच्या दोन दिवसांपूर्वीच बुधवारी दुपारी हे 100 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. काम पूर्ण होईपर्यंत महापारेषणच्या आनंदनगर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या आनंदनगर एमआयडीसीतील 13 एक्स्प्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहक, तसेच उल्हासनगर उपविभाग 4 व 5, अंबरनाथ पूर्व व पश्चिम, बदलापूर पूर्व व पश्चिम अंतर्गत सर्व ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरण व महापारेषणने आभार मानले.