रवींद्र धंगेकर पुण्यातील लोकप्रिय लोकनेते

    12-Mar-2025
Total Views |
 
 rav
पुणे, 11 मार्च (आ.प्र.) 
 
माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते आहेत. लोकांचे काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. धंगेकरही मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांनी आता धनुष्यबाण, भगवा ध्वज हातात घेतला आहे. मी त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांचे पक्षप्रवेशाचे स्वागत केले. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी धंगेकर यांना पक्षचिन्ह असलेले उपरणे देत त्यांच्या हाती पक्षाचा भगवा ध्वज दिला. त्यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्यांचेही शिंदे यांनी पक्षप्रवेश देत स्वागत केले.
 
मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. हू इज धंगेकर ते लोकांना कळेल शिंदे यांनी कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आठवण सांगितली. ते म्हणाले, सगळी फौज एका बाजूला लागली, तरी धंगेकर यांनी विजय मिळविला. कारण ते सर्वसामान्यांचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. लोकसेवक काय असतो, ते त्यांनी दाखवून दिले. मीही कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे काम करेल तो पुढे जाईल. आता हू इज धंगेकर ते लोकांना कळेल. धंगेकर म्हणाले, की मी पूर्वी शिवसेनेत काम केले आहे. मी शिवसेना परिवारात परत आलो आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक उपक्रम राबविले. उदय सामंत यांनी माझा इथपर्यंतचा प्रवास घडवून आणला. सर्वसामान्यांचे काम करणारे नेते अशी शिंदे यांची ओऴख आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी, सर्वसामान्य पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेत आलो आहे.