पुणे, 11 मार्च (आ.प्र.) :
भाजपने पुण्यात पक्षसंघटना बळकट करतानाच पक्षविस्तार करण्याची योजना आखली असून, पुणे शहराच्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्याच्या बारा मंडलांऐवजी 25 मंडल स्थापन करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत मंडलांची रचना पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. भाजपने आजपासून 20 मार्चपर्यंत पुणे शहरातील तीस हजार मतदान बूथचे प्रमुख नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही ठिकाणी आहे त्या बूथप्रमुखांना पुन्हा संधी देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांची निवड केली जाईल. पूर्वी एका मतदारसंघासाठी एक मंडल अशी भाजपची पक्षांतर्गत रचना होती. आता शंभर ते 120 बूथसाठी एक मंडल अशी रचना करण्यात येत आहे. दहा हजार कार्यकर्त्यांचे जाळे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि सरचिटणीस पुनीत जोशी यांनी ही माहिती दिली.
जोशी म्हणाले, की सर्वसाधारणपणे पुणे शहरातील आठ मतदारसंघांमघ्ये 25 मंडल आणि त्या प्रत्येक मंडलामध्ये शंभर कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर बूथरचना केली जाईल. असे मिळून सुमारे साडेपाच हजार कार्यकर्ते निवडले जातील. त्याचसोबत पक्षाच्या महिला, युवा अशा अन्य आघाड्यांमध्ये नियुक्ती करण्यात येईल. अशा पद्धतीने भाजपच्या दहा हजार सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे शहराच्या सर्व भागांत तयार होईल. पक्षाचे विचार, योजना या सर्वदूर पोहचविण्यासाठी या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठीही या कार्यकर्त्यांचे साह्य मिळेल.