एक लाख ग्राहकांची वर्षाला सव्वा कोटींची बचत

    04-Feb-2025
Total Views |
 
go
 
कल्याण, 3 फेब्रुवारी (आ.प्र.) :
 
महावितरणच्या कल्याण व भांडूप परिमंडलातील पर्यावरणस्नेही 1 लाखांहून अधिक ग्राहकांनी छापील कागदाचा वापर बंद करत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या गो-ग्रीन उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक जवळपास सव्वा कोटींचा थेट फायदा होत आहे. गो-ग्रीन उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत कल्याण परिमंडलातील 52129, तर भांडूप परिमंडलातील 49856 पर्यावरणस्नेही ग्राहकांनी केवळ ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला आहे.
 
दोन्ही परिमंडलातील एकूण 1 लाख 1 हजार 985 ग्राहक या उपक्रमात सहभागी घेऊन वर्षाला 120 रुपयांप्रमाणे 1 कोटी 22 लाख 38 हजार 200 रुपये वाचवत आहेत. या दोन्ही परिमंडलात गो ग्रीनच्या नोंदणीत वाशी मंडलाने आघाडी घेतली आहे. वाशी मंडलातील 22436, ठाणे शहर मंडलातील 18798, कल्याण-1 मंडलातील 18572, वसई मंडलातील 14619, कल्याण-2 मंडलातील 13652, पेण मंडलातील 8622 व पालघर मंडलातील 5286 ग्राहकांनी गो-ग्रीनमध्ये नोंदणी केली आहे.