संयुक्त महाराष्ट्राबाबत राज्य सरकारच्या भावना जाज्वल्य : डॉ. नीलम गोऱ्हे

    04-Feb-2025
Total Views |
 
nil
 
पुणे, 3 फेब्रुवारी (आ.प्र.):
 
‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात आयोजित विश्व मराठी संमेलन हे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर होणारे पहिले संमेलन असून, त्याद्वारे जगभरात मराठी संस्कृती संवर्धनाचे काम केले जात आहे,' असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी व्यक्त केले. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच राज्य सरकारच्या भावना जाज्वल्य असून, संमेलनात त्या लक्षात घेतल्या जातील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले; तसेच विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास करण्याचा निर्णय चुकला आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांना जनतेने नापास केले, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
 
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी फर्ग्युसन महाविद्यालय येथे पत्रकार परिषद घेत या संमेलनाचे स्वागत केले. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, संमेलनाच्या संयोजन समितीचे दीपक मराठे, चारुदत्त निमकर, शिवसेनेच्या पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणाईत, रंजना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‌‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता केली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या पुणे शहरात वेिश मराठी संमेलन होत असून, त्यामध्ये जगभरातील मराठी भाषक सहभागी होत आहेत. प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ठराव केले जातात.
 
आता मायमराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाची आपली जबाबदारी वाढली आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारच्या भावना जाज्वल्य असून, संमेलनात त्याचा उल्लेख होईल.' विविध देशांत मराठी भाषक मातृभाषा मायमराठीच्या संवर्धनाचे काम करतात. नवीन पिढीला मराठी यावी, यासाठी भाषेचे धडे देतात. त्यांच्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमाचे आणि परीक्षांचे प्रमाणीकरण आवश्यक असून, त्या अनुषंगाने विद्यापीठांसोबत प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.