मुंबई, 3 फेब्रुवारी (आ. प्र.) :
मुंबईतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. लहानशा घरात पोलिसांना राहावे लागत आहे. मुंबईत सेवानिवासस्थाने अपुरी पडत आहेत. एकूणच पोलिसांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता मात्र लवकरच म्हाडा 4750 पोलिसांना नवीन इमारतीत 480 ते 650 चौरस फूट क्षेत्रफळाची घरे देणार आहे. म्हाडाच्या 17 अभिन्यासांतील पोलीस सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्दे शानुसार म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी वास्तुरचनाकाराची नियुक्ती केली आहे. लवकरच आराखडा अंतिम करून प्रत्यक्ष पोलीस सेवा निवासस्थानांच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.
मंडळाचे मुंबईत 107 अभिन्यास आहेत. अनेक अभिन्यासांतील घरे सेवा निवासस्थान म्हणून मंडळाने महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाला दिली आहेत. या सेवा निवासस्थानांची दूरवस्था झाली असून, त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. त्यामुळे आता या पोलिसांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळावर सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार मंडळाने मुंबईतील 17 अभिन्यासांतील 4750 पोलिसांच्या निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
या 17 अभिन्यासांत बिंबिसार नगर, वनराई, पंतनगर, कुर्ला, मजासवाडी, टागोरनगरसह अन्य अभिन्यासातील सेवा निवासस्थानांचा समावेश आहे. या पुनर्विकासांतर्गत 480 ते 650 चौरस फुटांची 750 घरे बांधून ती महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला अतिरिक्त घरे उपलब्ध होणार असून, या घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. ही घरे नेमकी किती असतील हे आराखडा अंतिम झाल्यानंतरच स्पष्ट होईल. एकूणच पोलिसांना मुंबईत मोठी आणि उत्तुंग इमारतीत 4750 सेवा निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत.