पुणे, 2 फेब्रुवारी (आ.प्र.) :
सालाबादप्रमाणे यंदाही पद्मशाली समाजाचे आराध्य कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी यांचा जन्मोत्सव व रथयात्रा सोहळा श्री मार्कंडेय शिवालयम (वडगाव शेरी, पुणे) येथील मंदिरात अतिशय उल्हासपूर्ण भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते महिलांनी सादर केलेले टाळ आणि मृदंग संगीतावरील नृत्य. सर्व महिलांनी विशिष्ट रंगाची साडी परिधान करून भगवंताच्या रथासमोर नृत्य सादर केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिपूर्ण भाव टिपण्यासारखे होते. समाजातील सर्व स्तरांतील बंधू-भगिनी आणि भक्त- भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते. सदर सोहळ्यात आबालवृद्धांपासून समाजातील सर्व बंधू-भगिनींनी सहभाग नोंदविला. पद्मशाली समाजाचे आराध्य कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी यांचा जन्मोत्सव व त्याप्रीत्यर्थ रथयात्रा सोहळा साजरा करणारे श्री मार्कंडेय शिवालयम, वडगाव शेरी, हे नाव पुणे शहर पद्मशाली समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले.