मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहापदरी हाेणार

05 Dec 2025 23:48:44
 
 

Highway 
राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अखेर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहापदरीकरणाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गाचे दहापदरीकरण झाल्यास मुंबई पुणे प्रवास वाहतूक काेंडीमुक्त आणि अतिजलद हाेण्यास मदत हाेणार आहे.मुंबई-पुणे दरम्यानचा 94.5 कि.मी.चा द्रुतगती महामार्ग 2002 पासून वाहतूक सेवेत दाखल झाला. या महामार्गामुळे मुंबई- पुणे अंतर कमी झाले असून, प्रवास अडीच तासांत करणे शक्य हाेत आहे. राज्यातील सर्वांत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या या महामार्गावरून राेज 65 हजारांहून अधिकवाहने धावतात. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर बऱ्याच ठिकाणी वाहतूक काेंडी हाेत आहे, अपघात वाढत आहेत.
 
त्यामुळे वाहतूक काेंडीचा प्रश्न साेडवून प्रवास अतिजलद आणि सुरक्षित करण्यासह भविष्यातील वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी एमएसआरडीसीने सहापदरी महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीने आठपदरीकरणाचा प्रस्ताव रद्द करून महामार्गाचे थेट दहापदरीकरण करण्याचे निश्चित केले. या प्रस्तावानुसारदहापदरीकरणासाठी सुमारे 16 हजार काेटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील अंदाजे 200 काेटींचा निधी भूसंपादनासाठी लागणार आहे.दहापदरीकरणासाठी 100 मीटर रुंदीची जागा एमएसआरडीसीकडे उपलब्ध आहे.त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी काेणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. या दहापदरीकरणाच्या प्रकल्पात सहा बाेगदे बांधण्यात येणार आहेत. या बाेगद्यांसाठी 85 हेक्टर जागा संपादित करावी लागणार असून, त्यासाठी 200 काेटी रुपये लागणार आहेत.हा प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) वा इतर काेणत्या प्रारुपानुसार राबवायचा याचा निर्णय नंतर घेण्यात येणारल असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0