व्यसनाविषयी चर्चा : जेव्हा आपण ‘व्यसन’ या शब्दाचा विचार करताे, तेव्हा बहुतेक लाेकांच्या मनात मद्य, सिगारेट किंवा औषधांचे व्यसन, अशी उदाहरणे येतात. मात्र, आजच्या काळात तितकेच गंभीर आणि वाढते व्यसन म्हणजे ‘ऑनलाइन गेमिंग’चे आहे. या डिजिटल युगात भारतात सुमारे 9.1 काेटी लाेक ऑनलाइन किंवा डिजिटल गेम खेळतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘इंटरनेट एंटरटेन्मेंट आणि इनाेव्हेशन काैन्सिल’च्या अहवालानुसार, किशाेरवयीन मुलामुलींमध्ये आणि तरुणांमध्ये ‘गेमिंग’ हा मुख्य ‘टाईमपास’ झाला आहे. व्यसन असे, जे नकळत आणि सातत्याने त्यांच्या मानसिक-शारीरिक आराेग्यावर, शिक्षणावर आणि करिअरवर माेठा नकारात्मक परिणाम करत आहे.
कारणे आणि परिणाम : अपाेलाे मेडिक्स सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचे मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. उमर मशीर यांच्या मते, इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर (आयजीडी) हा आजार सुमारे 3.5% लाेकसंख्येत आढळताे (8.8 टक्के पुरुष तर 0.8% महिला) आणि ताे आता देशातील एक गंभीर मानसिक समस्या हाेत आहे. हा विकार झपाट्याने वाढण्यामागे प्रामुख्याने रिवार्ड सिस्टीम म्हणजेच जिंकण्याचे आणि पराभूत हाेण्याचे चक्र असते, जे मेंदूतील डाेपामिनची पातळी वाढवते. यामुळे मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण हाेते आणि खेळ न खेळल्यास तेवढीच अस्वस्थता वाढते. लहान आणि किशाेरवयीन मुले, या चक्राला माेठ्या संख्येने बळी पडतात कारण त्यांच्या मेंदूचा विकास पूर्ण झालेला नसताे.
वाढती लक्षणे, शासकीय हस्तक्षेप : गेमिंगच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींमध्ये चिडचिड, चिंता, एकटेपणा, खाेटे बाेलण्याची प्रवृत्ती, निराशा, आक्रमकता आणि आत्मविश्वास कमी हाेणे, ही लक्षणे सामान्यतः आढळतात.विद्यार्थी व तरुणांमध्ये शारीरिक परिणामही दिसतात - पाठदुखी, डाेळ्यांचे आजार, लठ्ठपणात वाढ, स्क्रीनटाइम वाढणे व अभ्यास किंवा करिअरकडे दुर्लक्ष. भारतात हे व्यसन राेखण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण उपाययाेजना केल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2020 मध्ये ‘डिजिटल वेलनेस’ (एक मार्गदर्शक याेजना) तयार केली. या याेजनेच्या अंतर्गत मुलांना इंटरनेटच्या सावध वापराबाबत शिक्षण दिले जाते. शिक्षकांनाही या विषयावर प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना याेग्य मार्गदर्शन करू शकतील.
वैद्यकीय उपाययाेजना आणि उपचार : मानसाेपचार तज्ज्ञ सांगतात, की या व्यसनाचा उपचार करताना दाेन स्तरांवर- व्यसनाचे वर्तन नियंत्रण आणि त्यामागील मानसिक समस्या (जसे की नैराश्य किंवा चिंतेचा विकार) ओळखून त्यावर उपचार करावे लागतात. डाॅ. मशीर यांच्या मते, हे व्यसन साेडवणे अवघड असले तरी याेग्य समुपदेशन, ‘डिजिटल डिटाॅक्स’ (स्क्रीनचा अतिवापर कमी करण्यासाठी आणि ऑफलाइन पर्यायांना प्राेत्साहन) आणि छंद जाेपासल्यास सुधारणा शक्य आहे. त्यांनी असेही नमूद केले की, डिजिटल गेमच्या व्यसनग्रस्त रुग्णांना तज्ज्ञ मानसाेपचार तज्ज्ञांकडून माेठ्या उपचाराची गरज असते.
सामाजिक परिणाम : गेमिंग व्यसन केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित राहत नाही. सर्व प्रथम, व्यसनामुळे त्या व्यक्तींचा (विशेषतः मुलांचा) कुटुंबातील नातेसंबंधांवरही परिणाम हाेताे. पालकांशी संवाद कमी हाेताे, डिजिटल उपकरण हे चक्क पालकांची जागा घेते, शिक्षणातली कामगिरी घसरते, करिअर घडवण्यात अडचणी सुरू हाेतात आणि समाजापासून दुरावा वाढताे, वैयक्तिक आणि सामाजिक परिणामांची सर्वसामान्य उदाहरणे आहेत. अनेक पालक सांगतात, की त्यांची मुले गेमिंगमुळे अभ्यास, झाेप आणि जेवण विसरले आहेत.
प्रतिबंधासाठी उपाय, सुरुवात कुटुंबातून : ऑनलाइन गेमिंगचे व्यसन या समस्येवर मात करण्यासाठी, काही प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. घरापासूनच सुरुवात करताना पालकांनी मुलांच्या सवयी, स्वभावातील व जीवनशैलीतील बदल, याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शाळांमध्ये डिजिटल डिटाॅक्सचा समावेश करणे, मुलांना पर्यायी छंद, खेळ, संगीत, किंवा चित्रकला जाेपासायला प्राेत्साहन देणे, हे तेवढेच गरजेचे आहे. तसेच पालकांनी मुलांशी संवाद साधून स्क्रीन टाइम ठरवून देणे आणि स्वतः उदाहरण घालून देणे गरजेचे आहे. मानसिक आराेग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने याेग्य मार्गदर्शन घेतल्यास, परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.