आर्मी हाॅस्पिटलमध्ये बालकावर अवघड शस्त्रक्रिया

28 Dec 2025 15:45:15
 
 

Army 
पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थाेरेसिक सायन्सेस (एआयसीटीएस) येथे नवजात बालकावर निओनेटल एक्स्ट्रा-काॅर्पाेरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. जन्मजात अत्यंत दुर्मीळ, जीवघेण्या हृदयराेगाने ग्रस्त असलेल्या नवजात बालकाचे प्राण याद्वारे वाचवण्यात आले.संरक्षण विभागाने याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. लष्करात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीचा अनेकदा गर्भपात झाला हाेता. त्यामुळे अतिशय जाेखमीच्या गर्भधारणेनंतर काेलकाता येथील लष्करी रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती झाली. मात्र, त्या नवजात बालकाची प्रकृती जन्मानंतर काही तासांतच खालावली. जन्मजात गंभीर हृदयविकारामुळे त्या बालकाचे हृदय शरीराला पुरेसा र्नतपुरवठा करू शकत नव्हते. त्यामुळे तातडीच्या प्रगत वैद्यकीय उपचारांशिवाय बालकाचे जिवंत राहणे कठीण हाेते.
 
अशावेळी काेलकाता येथील रुग्णालयातच तातडीने उपचार करून बालकाची प्रकृती तात्पुरती स्थिर करण्यात आली. मात्र, अंतिम उपचारांसाठी ओपन हार्ट सर्जरी आवश्यक असल्याने बाळाला पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथाेरेसिक सायन्सेस (एआयसीटीएसेथे आणण्यात आले.आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथाेरेसिक सायन्सेस ही लष्कराची अग्रगण्य वैद्यकीय संस्था आहे.कार्डिओ-थाेरेसिक शस्त्रक्रिया, हृदयराेग चिकित्सा आणि श्वसनराेग उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम या संस्थेने केले आहे. पुण्यातील रुग्णालयात दाखल झालेल्या बालकाला उपचारांदरम्यान तीव्र फुप्फुस संसर्ग आणि मूत्रपिंड कार्यक्षमता कमी हाेण्याचा त्रास हाेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बालकावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. मात्र, बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने उच्चस्तरीय नवजात अतिदक्षता उपचारांद्वारे, व्हेंटिलेटरच्या साह्याने बालकाची प्रकृती स्थिर केली.
 
या उपचारांनंतर बालकाच्या फुप्फुस व मूत्रपिंड कार्यक्षमतेत प्राथमिक सुधारणा झाल्यानंतर हृदयशस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदयाची अत्यंत गंभीर स्थिती, फुप्फुसांची मर्यादित कार्यक्षमता लक्षात घेऊन शस्त्रक्रियेनंतरही बाळाला व्हेंटिलेटरवरून वेगळे करता आले नाही. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही बालकाचे हृदय आणि फुप्फुसे तत्काळ शरीरावरचा ताण पेलू शकत नव्हती. त्यामुळे बालकाचे हृदय आणि फुप्फुसांना सावरण्यासाठी तात्पुरत्या ब्रिजची आवश्यकता हाेती.या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत एक्स्ट्राकाॅर्पाेरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) किंवा हृदय-फुप्फुस साह्य यंत्रणा असे म्हटले जाते.
 
ईसीएमओचा वापर प्राैढ रुग्णांसाठी करणेही आव्हानात्मक असताना तीन किलाेपेक्षा कमी वजनाच्या नवजात बाळावर ही प्रक्रिया करण्यासाठी अचूकता, निरीक्षण आणि विविध तज्ज्ञांमध्ये उत्कृष्ट समन्वय आवश्यक असताे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थाेरेसिक सायन्सेसमधील बालराेगतज्ज्ञ, परिचारिका, कार्डिओथाेरेसिक भूलतज्ज्ञ आणि बालहृदयराेग तज्ज्ञांच्या पथकाने हे आव्हान यशस्वीरित्या पार पाडले. सुमारे 90 तास ईसीएमओवर राहिल्यानंतर बालकाची प्रकृती सुधारून त्याचे हृदय आणि फुप्फुसे पुन्हा सक्षम झाली. जीवरक्षक उपकरणांवरून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आल्यानंतर बालक स्वत:हून श्वास घेऊ लागले. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थाेरेसिक सायन्सेसमध्ये प्रथमच निओनेटल ईसीएमओ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0