मागील समासातील ब्रह्मनिरूपण ऐकूनही काही श्राेत्यांचा संदेह म्हणजे संशय जात नाही. ते विचारतात की, असूनही काहीच नाही असे ते ब्रह्मज्ञान कसे? तुम्ही म्हणता की साधू सर्व करूनही अकर्ता असताे. सर्व भाेगूनही अभाेक्ता असा अलिप्तपणे राहताे हे कसे शक्य आहे? या सर्व संदेहांचे निराकरण करून त्यांना नि:संदेह करण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा हा तिसरा ‘‘नि:संदेहनिरूपण’’ समास आहे. श्राेत्यांनी या शंका मांडताना वक्त्याला जाे पेच टाकला आहे त्याचे वर्णन श्रीसमर्थ गमतीने ‘‘श्राेती घेतले आडरान’’ म्हणजे श्राेत्यांनी आडवाट धरलेली आहे असे करतात आणि त्या आडवाटेतून त्यांना बाहेर काढूपरमात्मप्राप्तीच्या सरळ वाटेला आणण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करावयास प्रारंभ करतात.
प्रत्येकजण आपल्या अनुभवांच्या आधारेच आपले मत बनवत असताे. प्रपंची माणसांना परमार्थाचा अनुभव नसल्याने त्यांच्या मनात या शंका येणे साहजिकच आहे. या त्यांच्या अज्ञानामुळेच ते अनेक दु:खे भाेगतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या ेऱ्यात अडकून पडतात. जी वस्तू ओळखावयाची असेल तिचे थाेडेतरी गुणधर्म माहीत असले तरच ती ओळखता येते. रामायणात लव आणि कुश यांनी घाेडा पूर्वी कधीच पाहिलेला नसल्याने त्यांना ताे ओळखता आला नाही, तसेच हे सूत्र आहे.म्हणून याेगी जाणण्यासाठी थाेडातरी याेग अंगी असला पाहिजे. थाेडेतरी ज्ञान असल्याशिवाय ज्ञानी ओळखता येणार नाही आणि चातुर्य असलेला पुरुषच महाचतुर माणसाला ओळखू शकताे.