मुंबईत जागतिक दर्जाचा मरिना प्रकल्प हाेणार

25 Dec 2025 15:35:46
 

marina 
 
मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने 887 काेटींचे ‘मरीना केंद्र’ विकसित करण्याच्या याेजनेला नुकतीच मंजुरी दिली. मुंबई पाेर्ट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात नाैवहन, सागरी पर्यटन, मनाेरंजन केंद्रे विकसित केली जाणार आहेत.विकसित भारत मुंबई मरीना असे या प्रकल्पाचे नाव असून, या प्रकल्पामुळे जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण हाेईल, असा विश्वास केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी मंत्री सर्वानंद साेनाेवाल यांनी व्य्नत केला. नाैवहन, बंदर आणि सागरी पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे खासगी गुंतवणुकीला प्राेत्साहन मिळेल, राेजगाराच्या संधी निर्माण हाेतील,किनारपट्टी भाग विकसित करून सार्वजनिक वापरासाठी ते खुले केले जातील, असे बंदरे व जहाजबांधणी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
मंत्रालयाने बंदर प्राधिकरणाच्या गुंतवणुकीला मान्यता दिली असून, निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेची मुदत 29 डिसेंबर आहे. महाराष्ट्र सरकार मुंबई बंदरातील माेकळ्या भूखंडावर पूर्वे कडील समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्राचा मरीना प्रकल्पही पूर्वेकडील समुद्र किनाऱ्याला शहरातील नवीन आकर्षण बनवण्याच्या याेजनेचा एक भाग आहे. सुमारे 12 हेक्टर क्षेत्रफळावर नियाेजित असलेल्या या प्रकल्पात 30 मीटर लांबीच्या 424 नाैका बसवण्याची क्षमता, खासगी माध्यमातून किनाऱ्यावरील सुविधांचा विकास.
 
त्यात मरीन टर्मिनल इमारत, नाैकानयन प्रशिक्षण केंद्र, सागरी पर्यटन विकास केंद्र, हाॅटेल व क्लबहाऊस सुविधा, काैशल्य विकास केंद्राची उभारणीचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे नाैकानयन, क्रूझ सेवा, आदरातिथ्य आणि संबंधित क्रियाकलापांमध्ये 2000 हून अधिक राेजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.हा प्रकल्प सरकारी-खासगी तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरण अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) आधारावर किनारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे 470 काेटी रुपये गुंतवेल आणि खासगी माध्यमातून 417 काेटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीतून किनारी सुविधा विकसित केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0