काेयना प्रकल्पातून राज्याला 1320 मेगावाॅट वीज मिळणार

25 Dec 2025 15:30:52
 

Koyna 
 
काेयना प्रकल्पाचे दाेन टप्पे तात्पुरते बंद केल्यानंतर चाैथ्या टप्प्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे. तिसऱ्या आणि चाैथ्या टप्प्यातून 1320 मेगावाॅट वीज राज्याला मिळणार आहे.काेयना धरणातून पाेफळीतील वीज निर्मिती प्रकल्पाकडे येणाऱ्या बाेगद्याला गळती लागली आहे. ती गळती काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काेयना प्रकल्पाचा टप्पा-1 आणि 2 बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या एकूण विजेच्या काेट्यातून सहाशे मेगावाॅट विजेची कमतरता भासणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी चाैथा टप्पा अखंडित सुरू ठेवण्याचा पर्याय महानिर्मितीकडे आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रकल्पाचा चाैथा टप्पा चालूराहणार आहे. चाैथ्या टप्प्याला काेयना धरणातून पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र बाेगदा तयार करण्यात आला आहे.काेयना प्रकल्पाच्या विजेचा खर्च कमी आहे आणि ही वीज जलदपणे ग्रीडमध्ये येते. राज्याला मागणीच्या काळात जलद वीजपुरवठा करता यावा यासाठी चाैथ्या टप्प्याची उभारणी करताना शासनाने चाैथ्या टप्प्यासाठी स्वतंत्र बाेगदा तयार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात अडीचशे मेगावाॅट क्षमतेचे चार टर्बाईन आहेत.
 
त्यातून 1000 मेगावाॅट वीजनिर्मिती केली जाते. काेयना धरणातून निघणाऱ्या पाण्यावर दाेन वेळा वीजनिर्मिती करता यावी. टप्पा-1, 2 आणि 4 मधून निघणारे पाणी थेट वाशिष्टी नदीत जाऊ नये यासाठी काेळकेवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. काेळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या टप्प्यातून 320 मेगावाॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.वाशिष्टी नदीत वाहणारे काेयना नगरपालिका शहरातील नागरिकांची तहान भागवते. लाेटे, खेर्डी आणि गाणे खडपाेली एमआयडीसीला लागणारे पाणीही वाशिष्टीतून उचलले जाते. वाशिष्टीत काेयना अवजलचे पाणी साेडले नाही तर नदी पूर्णपणे काेरडी पडते. सध्या काेयना धरणातून पाेफळीकडे येणारे पाणी बंद झाले असले, तरी चाैथ्या टप्प्याला येणारे पाणी चालू आहे. चाैथ्या टप्प्यात वीज निर्मिती झाल्यानंतर हे पाणी काेळकेवाडी धरणात येणार आणि तेथे वीज निर्मिती झाल्यानंतर ते पाणी चिपळूणच्या दिशेने साेडले जाणार आहे. त्यामुळे चिपळूण शहर आणि परिसरातील औद्याेगिक वसाहतींवरचे जलसंकट टळले आहे.
Powered By Sangraha 9.0