ताे कृपापीयूषसजळु। आणि येरु जवळां आला वर्षाकाळु। नाना श्रीकृष्ण काेकिळु। अर्जुन वसंतु ।। 11.113

23 Dec 2025 23:19:00
 

saint 
 
श्रीकृष्णांनी आपणांस त्यांचे विश्वरूप दाखवावे म्हणून अर्जुन किती व्याकूळ झाला आहे, हे आपण पाहिले. ताे पराेपरीने श्रीकृष्णांना विनंती करीत आहे आणि श्रीकृष्ण कृपामृताचे बिंदू हाेऊन त्याच्याकडे आकर्षित हाेत आहेत. परमात्मा आपलासा व्हावा म्हणून काकुळती, तळमळ, मनाची उत्सुकता यांची आवश्यकता असते.श्रीकृष्णांचे माहात्म्य सांगताना अर्जुनाने काही उदाहरणे दिली आहेत. आपल्या शत्रूंनादेखील देव माेक्ष देताना याेग्यायाेग्य पाहात नाहीत, हे सांगताना अर्जुन म्हणताे, ‘देवा, पूतना स्तनपान करवून तुला मारावे या हेतूने आली हाेती, पण तू तर तिचा उद्धार केलास. राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालाने तुझा अपमान केला, पण तू शिशुपालाला आपल्या ठिकाणी स्थान दिलेस.’ ‘धु्रवाला तू इंद्रासूर्यांपेक्षा माेठे स्थान दिलेस.
 
याप्रमाणे देवा, तुझ्यावर अपकार करणाऱ्या लाेकांचाही तू उद्धार केलास. ज्या गणिकेने तुझी कधी पूजा केली नाही, ती गणिका आपल्या पाेपटास ‘राघव राघव’ म्हणून हाका मारीत हाेती.त्या गणिकेस तू वैकुंठात स्थान दिलेस.देवा, दान देताना तू पात्र व अपात्र असा विचार करीत नाहीस. कामधेनूची वासरे कधी उपाशी राहतील का? म्हणून देवा, माझी विनंती मान्य करा. तुमचे विश्वरूप पाहण्याची याेग्यता मला द्या.’ अर्जुनाची ही काकुळती ऐश्वर्यसंपन्न देवाला सहन झाली नाही.ताे श्रीकृष्ण कृपामृताने जलयुक्त असा मेघच हाेता. ताे अर्जुनाला वर्षाकाळ झाला.श्रीकृष्ण हा काेकीळ व अर्जुन वसंतॠतू बनला. देवांना अर्जुनाच्या विनवणीमुळे अधिक आनंद झाला.
Powered By Sangraha 9.0