ओशाे - गीता-दर्शन

23 Dec 2025 23:15:13
 

Osho 
कृष्ण असे म्हणताे, त्याला कशाची आशा नसते, त्याला कसला संग्रहही करायचा नसताे.अशा समत्वाला उपलब्ध असलेल्या याेग्याने परमात्म्याचे स्मरण करावे, परमसत्तेच्या दिशेने गती करावी. ‘एकांतात’- तेव्हा या सूत्राचे चुकीचे अर्थ लावणं खूप साेपं झालं.अर्जुन हेच तर म्हणताेय, ‘कृष्णा मला येथून, युद्धातून निघू जाऊ दे, वनात एकांतात, चिंतन-मनन करू दे, प्रभू-स्मरण करू दे, जाऊ दे मला,’ कृष्ण त्याला का अडवित आहे? पुन: पुन्हा युद्धाेन्मुख का करीत आहे? कर्माेन्मुख का करीत आहे? तू कर्म करीत रहा, सम हाे, समत्वाला उपलब्ध हाे, पण कर्मात रममाण हाेऊन जीवन जग.
 
असं कृष्ण का म्हणताे आहे? कृष्णाच्या ‘एकांता’चा अर्थ समजावून घेतला पाहिजे.एकांताचा अर्थ एकटेपणा नव्हे वा आयसाेलेशन नव्हे. एकांताचा अर्थ आहे, स्वत:मध्ये असणे, परनिर्भर नसणे. इतर माणसांची गैरहजेरी म्हणजे एकांत नव्हे.दुसऱ्या काेणाच्या उपस्थितीची आवश्यकता नसणं असा एकांताचा अर्थ आहे. हा फरक नीट समजावून घेतला पाहिजे. आपण जंगलात बसला आहात.
बिलकूल एकांतात, शेकडाे मैलांपर्यंत दुसरं काेणीही हजर नाही. तरी पण आपण एकांतात असू शकाल असं मला वाटत नाही.
Powered By Sangraha 9.0