नाशिकमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी; तसेच कुंभमेळ्यात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) नाशिक परिक्रमा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग आता माेकळा झाला आहे. एमएसआयडीसीने 66 कि.मी.च्या परिक्रमा मार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. अंदाजे 3200 काेटींहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सात टप्प्यांत करण्यात येईल.राज्य रस्ते विकास महामंडळाने अंदाजे 8 हजार काेटी रुपये खर्चाचा (भूसंपादन आणि बांधकाम मिळून) नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला हाेता.
मात्र, निधी उभारण्याच्या आव्हानामुळे एमएसआरडीसीच्या अडचणी वाढल्या.
शेवटी एमएसआयडीसीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या प्रकल्पाच्या कामासाठी एमएसआयडीसीला निधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर प्रकल्पातील आर्थिक अडचण दूर झाली आणि राज्य सरकारने हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून एमएसआयडीसीकडे वर्ग केला. त्यानंतर तातडीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचलत एमएसआयडीसीने परिक्रमा मार्गाच्या बांधकामासाठी नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.निविदा 5 जानेवारीपर्यंत सादर करता येणार आहेत. निविदा प्रक्रिया आणि भूसंपादन शक्य तितक्या लवकर पूर्ण करून परिक्रमा मार्गाचे काम सुरू करण्याचे एमएसआयडीसीचे नियाेजन आहे.