काेणताही काैटुंबिक लष्करी वारसा नसताना जिद्दीच्या जाेरावर राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत (एनडीए) प्रवेश मिळवून तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करतानाच सर्वाेत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी पदक मिळवण्याची दमदार कामगिरी तीन छात्रांनी केली. त्यात पुण्याच्या विश्वेश भालेराव या छात्राचा समावेश असून, या छात्रांच्या कामगिरीचा त्यांच्या कुटुंबीयांनाही अभिमान आहे. दरम्यान, 15 महिला छात्रांची दुसरी तुकडी अभिमानाने उत्तीर्ण झाली आहे. मुलींची वाटचाल दृढ आणि प्रभावी बनत असल्याचे चित्र एनडीएच्या यंदाच्या दीक्षान्त साेहळ्यात दिसून आले.एनडीएच्या 149 व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ केंद्रीय लाेकसेवा आयाेगाचे (यूपीएससी) अध्यक्ष डाॅ.अजय कुमार यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यात कार्तिक माहेश्वरी या छात्राला विज्ञान शाखेचे राैप्य, अनन्या बालाेनी या महिला छात्राला संगणक विज्ञान शाखेचे राैप्य, अनुराग गुप्ता या छात्राला कला शाखेचे राैप्य, तर विश्वेश भालेराव या छात्राला बी.टेक शाखेतील राैप्य पदक प्रदान करण्यात आले.एनडीएतील 15 महिला छात्रांची दुसरी तुकडी उत्तीर्ण झाली आहे. मुलींची वाटचाल प्रभावी बनत असल्याचे भावपूर्ण चित्र दीक्षान्त साेहळ्यात दिसून आले. या दीक्षान्त समारंभात दुसऱ्या महिलांच्या तुकडीनेही प्रशिक्षित विद्वान याेद्धे म्हणून आपली तयारी सिद्ध केली.प्रशिक्षणातील कठाेर शिस्त, मैदानी आव्हानांची ओळख, स्क्वाॅड्रनमधील परस्पर सहकार्य आणि एकात्मता या सर्व घटकांनी या छात्रांना मानसिक आणि शारीरिक पातळ्यांवर अधिक सक्षम केले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर यश, आत्मविश्वास आणि अभिमानाची चमक दिसून येत हाेती.