गाद्या-उशा-पडद्यामधील अतिसूक्ष्म तंतू हानिकारक

    12-Dec-2025
Total Views |
 

Health 
 
तुम्ही नियमितपणे तुमचे घर स्वछ करत नसाल, तुमचे बेडशीट, उशांचे खाेळ, पडदे, कार्पेट इत्यादी नियमितपणे धुऊन वापरात आणत नसाल तर नकळतपणेच मायक्राेफायबर्स (अतिसूक्ष्म रेषा किंवा तंतू) तुम्ही तुमच्या श्वासात घेत आहात.आयआयटी मद्रासकडून करण्यात आलेल्या एका संशाेधनामध्ये असे आढळून आले हाेते की, शहरांमध्ये येणारी निवासस्थाने, कार्यालये आणि हाॅस्टेल्समध्ये मुबलक प्रमाणात मानव सर्जित मायक्राेफायबर्स उपस्थित असतात, ते तिथे राहणाऱ्या लाेकांच्या आराेग्यासाठी धाेकादायक हाेत आहेत.संशाेधनामध्ये नाेंदवण्यात आले हाेते की, बेडरूममध्ये सगळ्यात जास्त, प्रत्येक चाैरस मीटरावर अंदाजे 16,736 मायक्राेफायबर्स हाेते, त्यानंतर हाेस्टेलच्या खाेलीमध्ये 5,572 एवढे मायक्राेफायबर्स हाेते.
 
यांपैकी 72 % फायबर्सचा आकार 500 माइक्राेन्सपेक्षाही कमी हाेता, तर काही तर 2.02 माइक्राेन्स एवढे सूक्ष्म हाेते. एवढे सूक्ष्म मायक्राेन्स श्वासावाटे सहजपणे फुप्फुसांत थेट आत खाेलपर्यंत पाेहाेचून मानवाच्या आराेग्याला हानी पाेहचवू शकतात. विशेषकरून मुले दीर्घ काळ बेडरूममध्ये घालवत असल्याने त्यांच्यासाठी हे माइक्राेन्स जास्त धाेकादायक बनतात.या फायबर्समधून 48.2% सेमी-सिंथेटिक, 29.3% नैसर्गिक आणि 22.5% सिंथेटिक असतात. बेडरूममधल्या बिछान्यावर अंथरलेल्या चादरी, उश्यांच्या खाेळी, पडदे, गालिचे आणि टाॅवेलवर रेयाॅन, काॅटन, तसेच पाळीव प्राण्यांची फर यांसारखे मायक्राेफायबर्सची उपस्थिती अगदीच सामान्य गाेष्ट आहे.
 
अ‍ॅटमाेस्फियरिक पाेल्यूशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या द स्टडी फर्स्टचे लेखक ए.एंजल जेस्सीलीना म्हणाले हाेते की, जिथे लाेक राहात नसतील अशा ठिकाणांच्या तुलनेत निवासी भागात अस्वच्छ परिस्थितीचे प्रमाण जास्त आढळून आले, ज्यामुळे असे मानण्यात येते की, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वांत सामान्य कापडाच्या वस्तूंमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात मायक्राेफायबर्स निर्माण हाेतात. अभ्यासात रस्त्यांवरून उडणारी धूळ, तसेच घराच्या आत रबर किंवा लॅटेक्सपासून निर्माण हाेणाऱ्या मायक्राेफायबर्सचा उल्लेखही करण्यात आला हाेता. या अभ्यासासाठी लॅबाेरेटरीज, कार्यालये आणि आयआयटी मद्रास स्थित हाेस्टेल्स, शिवाय वेलाचेरी, तसेच पल्लिकारानाईमध्ये येणाऱ्या निवासस्थानांतून नमुने गाेळा करण्यात आले हाेते.