महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनातर्फे टूर सर्किट

01 Dec 2025 23:16:10
 

tour 
 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालयामार्फत 3 ते 5 डिसेंबर या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे आयाेजन करण्यात आले आहे. चैत्यभूमीस भेट देणारे पर्यटक, तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डाॅ. आंबेडकरांचे प्रेरणादायी कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पाेहाेचवणे हा या टूर सर्किटचा मुख्य उद्देश आहे. पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.डाॅ. आंबेडकर पर्यटन सर्किट ही केवळ पर्यटन संकल्पना नसून, देशाच्या लाेकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्य, संघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पाेहाेचणार आहेत.
 
पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रम, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनास जाेडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळेअनुयायी, पर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे देसाई यांनी सांगितले.
या टूर सर्किटमध्ये मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इकाॅनाॅमिक्स व काॅमर्स महाविद्यालय, वडाळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधील बीआयटी चाळ, सिद्धार्थ महाविद्यालय, फाेर्ट या स्थळांचा समावेश आहे. या टूर सर्किटच्या माध्यमातून डाॅ.आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनप्रवास, सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील याेगदानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पाेहाेचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
Powered By Sangraha 9.0