महाराष्ट्र हा माझ्या रक्तात, स्वभावात आणि आचरणात असून, काेणत्याही पदावर यशस्वी हाेण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरूप हाेणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाेबतचे टीम वर्क महत्त्वाचे ठरल्याची भावना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली.मुख्य सचिव राजेश कुमार 30 नाेव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांचा सेवापूर्ती समारंभ मंत्रालयात आयाेजिण्यात आला.
यावेळी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना, राज्य अनुसूचित जाती-जमाती अधिकारी कर्मचारी संघटना, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, आयएएस अधिकारी संघटना यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी राजेश कुमार यांच्या पत्नी अर्चना राजेश कुमार, नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. मुख्य सचिव पदावर काम करताना सर्वांना साेबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. 37 वर्षांहून अधिक काळातील सेवेत राज्याच्या कानाकाेपऱ्यातील लाेकांना भेटटता आले.राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्याकडे क्षमता आणि अनुभव असून, त्यांनी महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत अग्रस्थानी नेण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत काम करावे.