हातमागावर पारंपरिक कापडाच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचे बुके तयार केले आहेत. कापडाचे बुके या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.विविध समारंभांत फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे.
त्याऐवजी कायम स्मरणात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयु्नत ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले आणि तेवढेच आकर्षक कापडाचे बुके हातमाग महामंडळाने तयार केले आहेत.अधिवेशनासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या स्वागतासाठी हा बुके संस्मरणीय ठरणार आहे.
हातमाग महामंडळातर्फे विणकरांना प्राेत्साहन देण्यासाेबतच नवनिर्मित कापडाच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हातमागावरील कापडाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून, नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कापडी बुके ही संकल्पना हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरू करण्यात आली असून,नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टाॅवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाेबतच हस्तकलेद्वारे निर्मित बकेटमध्ये विविध प्रकारच्या हातमाग कापडांचा समावेश असलेले आकर्षक वेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रांवर विक्रीची व्यवस्था आहे.