शाळा तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना याेग्य ती मदत मिळावी यासाठी एसटीची 1800221251 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.राज्यभरातील लाखाे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी एसटी बस फेऱ्या उपलब्ध करून देते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये 66.66 ट्नके सवलत दिली जाते; तसेच पुण्यश्लाेक अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना माेफत मासिक पास दिला जाताे.
सरनाईक यांनी धाराशिव बस स्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारीमांडल्या. अनेक शालेय बस वेळेवर न सुटणे, गर्दीमुळे बस थांब्यावर न थांबणे, बस उशिरा येणे अथवा अचानक रद्द हाेणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. या तक्रारींची तातडीने दखल घेत सरनाईक यांनी एसटीची हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1800221251 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलाअसून, या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन एसटीने केले आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयांना 31 विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात येत आहेत.त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत शाळा- महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी या विभाग नियंत्रकांना संपर्क साधू शकतात.