विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता : पाटील

09 Oct 2025 23:43:49
 

Patil 
 
राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी कुलपती तथा राज्यपाल कार्यालयाच्या निर्देशांनुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापकांसाठी विद्यापीठ अनुदान आयाेगाकडून शैक्षणिक अर्हता आणि अनुषंगिक बाबी निश्चित करण्यात येतात. विद्यापीठ अनुदान आयाेगाकडून 18 जुलै 2018च्या अधिसूचनेनुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील अध्यापकांच्या नियु्नतीसाठी आवश्यक किमान अर्हता आणि उच्च शिक्षणातील दर्जा कायम ठेवण्यासाठीच्या आवश्यक उपाययाेजना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
 
या अधिसूचनेतील तरतुदी राज्यात लागू करण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार अध्यापकांची निवड प्रक्रिया राबवण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली हाेती. ही निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी त्यात सुधारणा करण्यात आली आहे.सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेल्या अध्यापक व सांविधिक पदांच्या निवड प्रक्रिया नव्या कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात येणार असून, भविष्यात हाेणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेसाठी याच कार्यपद्धतीचा वापर करणे बंधनकारक अससल्याचे पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0