नवी मुंबई हे नियाेजित शहर असले, तरी लाेकसंख्या वाढीने अपेक्षेपेक्षा अधिक वाहने झाल्याने शहरात पार्किंग समस्येने बिकट रूप धारण केले आहे. त्यावर उतारा म्हणून नवी मुंबई महापालिकेने 22 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ याेजना आखली असून, यामुळे 3 हजारांवर वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळणार आहे.नवी मुंबईत आठही नाेडमध्ये कमीअधिक प्रमाणात पार्किंगची समस्या आहे.
त्यात ऐराेली सीबीडी आणि काेपरखैरणे या ठिकाणी सर्वाधिक पार्किंग समस्या आहे.वाशीत खास पार्किंगसाठी बहुमजली इमारत आणि नाल्यावर स्लॅब टाकून साेय करण्यात आली आहे. सध्या आखलेल्या पे अँड पार्क याेजनेनुसार सीबीडी आणि ऐराेली दरम्यान 22 ठिकाणी पार्किंग जागांचे व्यवस्थापन व संचालनासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात 1368 दुचाकी आणि 2768 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची साेय हाेणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.अंतर्गत रस्ते माेठे असूनही पार्किंगची समस्या उग्र बनत चालली आहे. अनेकदा वाहने केवळ रस्त्यांवरच नव्हे, तर उद्याने आणि खेळाच्या मैदानांतही पार्क केली जातात.