लाेणार सराेवरासाठी कॅराव्हॅन सुविधा; पर्यटकांना दिलासा

08 Oct 2025 23:21:30
 

lonar 
 
सुसज्ज स्वागत केंद्रापाठाेपाठ महानगरांतील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आता लाेणार सराेवराच्या परिसरात कॅराव्हॅन (फिरते घर) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुसज्ज वाहनामुळे पर्यटकांचा प्रवास सुकर हाेणार आहे.जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लाेणार सराेवर हे भूगर्भीयदृष्ट्या; तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील एकमेव अद्वितीय सराेवर मानले जाते.लाेणार सराेवर आता कॅराव्हॅन सेवेच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आणखी सुलभ, आकर्षक व राेमांचक ठरणार आहे. लाेणारला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून कॅराव्हॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.लाेणारला दरवर्षी हजाराे देशी- विदेशी पर्यटक भेट देतात.
 
अंदाजे 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले लाेणार सराेवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सराेवर आहे.वैज्ञानिक, धार्मिक; तसेच पर्यावरणीय दृष्टिकाेनातून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाेणार सराेवराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपाययाेजना आखण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी आता कॅराव्हॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संपर्क करून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटकांना या सुविधेद्वारे लाेणारला येता येणार आहे.नुकतीच पहिली कॅराव्हॅन नाशिक व छत्रपती संभाजीनगरमार्गे लाेणारला आली. यामुळे लाेणारला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे.राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेऊन त्याचा लाभ स्थानिक व्यापारी, हाॅटेल व्यवसाय, मार्गदर्शक; तसेच पर्यटनाशी निगडित उद्याेगांना हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0