इतर देशांचे, भाषांचे सिनेमे पाहिले की त्यातून फिल्ममेकिंग असंही असू शकतं, हे समजत जातं. त्यामुळेच सुजाण प्रेक्षक आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित लाेक नेहमी उत्तमाेत्तम सिनेमे पाहात असतात.काेंकणा सेन शर्मा ही अभिनेत्री- दिग्दर्शक अपर्णा सेनची मुलगी. अपर्णा सेन ही सत्यजित राय यांच्या चार सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री आणि 36, चाैरंगी लेन या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या सिनेमातच आंतरराष्ट्रीय ख्याती कमावलेली दिग्दर्शक. त्यामुळे काेंकणावर सिनेमाचा संस्कार हाेताच.तिला जागतिक सिनेमे पाहण्याची ओढ हाेतीच. त्यातूनच ती काही मित्रांबराेबर वाेंग कार वई या नामवंत दिग्दर्शकाचा ‘इन द मूड फाॅर लव्ह’ हा सिनेमा पाहायला गेली. या सिनेमाचं स्वप्नील चित्रीकरण, संथ गती, अतिशय स्टायलिश रंगसंगती, अभिनय आणि संगीत यांची जादूच त्या काळात जगभरातल्या प्रेक्षकांवर पडली हाेती. पण काेंकणा हा सिनेमा पाहायला गेली तेव्हा भुकेलेली हाेती आणि या सिनेमात नायक-नायिका सतत काही ना काही आकर्षक पदार्थ खाताना दिसतात. ते पाहून या सगळ्या गँगच्या ताेंडाला पाणी सुटायला लागलं, भूक आणखी प्रज्वलित हाेऊ लागली. सगळे सिनेमा अर्ध्यात साेडून बाहेर पडले आणि त्यांनी आधी पाेटभर खादाडी केली.
त्यानंतर हा सिनेमा तिने अनेकदा लक्ष देऊन आस्वादला ताे भाग वेगळा.