गडचिराेलीची वाटचाल माओवाद समाप्तीकडे

    17-Oct-2025
Total Views |
 

CM 
 
केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांतून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्हाेरक्यांसह एकूण 61 जणांनी सशस्त्र आत्मसमर्पण करणे ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून, माओवाद पूर्णपणे हद्दपार हाेण्याच्या स्थितीत आज आपण पाेहाेचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिराेली जिल्हा करत असून, महाराष्ट्रासाठी हे अभिमानस्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येथे साडेपाच काेटींहून अधिकचे बक्षीस असलेला नक्षल म्हाेरक्या भूपती उर्फ मल्लाेजुल्ला वेणूगाेपालराव याच्यासह एकूण 61 जहाल माओवाद्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केले. त्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमाेर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लाेकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.
 
पाेलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पाेलीस महासंचालक विशेष कृती डाॅ. छेरिंग दाेरजे, विशेष पाेलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डाॅ. मिलिंद नराेटे, पाेलीस उपमहानिरीक्षक अंकित गाेयल, जिल्हा पाेलीस अधीक्षक निलाेत्पल, केंद्रीय राखीव पाेलीस दलाचे उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.आत्मसमर्पण करणाऱ्यांना लाेकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल हाेईल, असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गडचिराेली पाेलीस आणि केंद्रीय राखीव दलाचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.