भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन साेसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र याेजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यात मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था आणि दाेन वसतिगृहांचे अद्ययावतीकरण, जीर्णाेद्धार, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षात, दरवर्षी 100 काेटी याप्रमाणे 500 काेटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. राज्य शासनाने डाॅ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित स्थळांच्या विकासाचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार नऊ महाविद्यालये आणि दाेन वसतिगृहांचे जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र याेजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या याेजनेमुळे साेसायटीच्या पायाभूत सुविधांत सुधारणा हाेईल आणि अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. तसेच, या निर्णयामुळे ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांचे जतन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता वाढणार आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.