महावितरणचे धावपटू वसावेंना 2 सुवर्ण ;वाईकर भारतीय खो-खो संघाचे कर्णधार

    16-Jan-2025
Total Views |
 
 
inn
 
पुणे, 15 जानेवारी (आ.प्र.) :
 
महावितरणच्या पुणे परिमंडलाचे कर्मचारी व उत्कृष्ट खेळाडू गुलाबसिंग वसावे (शिवाजीनगर विभाग) आणि प्रतीक वाईकर (पर्वती विभाग) यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे. कर्नाटकातील आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गुलाबसिंग वसावे यांनी भारताला दोन सुवर्ण, तर एका रौप्यपदकाची कमाई करून दिली. प्रतीक वाईकर यांची खो-खो वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मंगळूरमध्ये 10 ते 12 जानेवारीदरम्यान आयोजित साऊथ एशिया मास्टर्स ओपन ॲथलेटिक्स स्पर्धेत धावपटू वसावे यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी 200 आणि 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तर 400 रिलेत रौप्यपदक मिळवले.
 
या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आदी देशांतील सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले होते. वाईकर यांना खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. भारत, अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पोलंड, दक्षिण कोरिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी 20 देशांच्या सहभागाची खो-खो वर्ल्डकप स्पर्धा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होत आहे. राज्य शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त वाईकर यांचा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दबदबा आहे. उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वसावे व वाईकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक अरविंद भादिकर, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी कौतुक केले आहे.