उत्तम आराेग्याच्या त्रिसूत्रीमध्ये पुरेशा आणि शांत झाेपेचा समावेश हाेताे. प्राैढांना रात्री किमान सात तास झाेप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत असले, तरी अनेकांना ती मिळत नाही. काेणी रात्री उशिरापर्यंत जागतात म्हणून, काेणी काम करत राहतात म्हणून आणि काेणी डिजिटल गॅजेट्समध्ये गुंतून पडले म्हणून झाेप अपुरी राहते. स्मार्टफाेनमुळे लाेक आता क्षणभरही स्वस्थ बसलेले दिसत नाहीत. दिवसभराची कामे संपवून रात्री शांतपणाने झाेपणारे विरळाच असतील.अंथरुणावर पडल्यापडल्या लाेक रील्स पाहतात, चॅटिंग करतात, एका अॅपवरून दुसऱ्यावर जातात, टे्निस्टंग करतात अथवा नेटफ्ल्निसवरच्या न थांबणाऱ्या मालिका बघत बसतात. या सगळ्यांत आपल्याला झाेप हवी आहे याचा विसर पडताे आणि मग उशिरा केव्हा तरी आपण झाेपताे.
हेच चक्र चालू राहते. अंथरुणावर पडल्यानंतर स्मार्टफाेनमध्ये गुंतून राहण्याचे शारीरिक-मानसिक आराेग्यावर कसे दुष्परिणाम हाेत आहेत यावर तज्ज्ञ वारंवार सांगत असूनही लाेकांमध्ये फार फरक पडलेला नाही. या फाेनच्या वापरामुळे झाेप कमी हाेते आहे आणि त्याचे दुष्परिणामही दिसायला लागले आहेत.‘रात्री झाेपण्यापूर्वी स्मार्टफाेनचा वापर केल्यामुळे मेंदूवर त्याचा परिणाम हाेऊन झाेप उशिरा येते,’ असे गुरुग्राममधील फाेर्टिस मेमाेरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील सल्लागार मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. शांभवी जयमीन यांनी सांगितले. ‘मनस्थळी वेलनेस’च्या संस्थापिक डाॅ. ज्याेती कपूर यांच्या म्हणण्यानुसार, रात्री झाेपण्यापूर्वी स्मार्टफाेनचा अतिवापर केल्यामुळे झाेपेची गुणवत्ता आणि वेळेवर परिणाम हाेताे. झाेपण्यापूर्वी चार तास आधी आयपॅडवर आणि छापील पुस्तकाचे वाचन करणाऱ्या काही सहभागींवर एक प्रयाेग केला गेला.
आयपॅडवर पुस्तक वाचणाऱ्यांमधील मेलाटाेनिनची पातळी घटल्याचे त्यात दिसले.आपले जागणे-झाेपण्याचे चक्र या संप्रेरकामुळे सांभाळले जाते.याची पातळी सायंकाळी वाढते आणि त्यामुळे रात्री गाढ झाेप लागते. आयपॅडवर वाचन केलेल्यांमध्ये या संप्रेरकाची पातळी कमी आढळली आणि त्यांचे गाढ झाेपेचे चक्रही कमी झाल्याचे दिसले.‘स्मार्टफाेनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलाटाेनिनच्या पातळीवर परिणाम हाेऊन झाेपेचे चक्र विस्कळीत हाेते,’ असे डाॅ. ज्याेती कपूर यांनी सांगितले. प्रकाशाच्या वर्णपटात निळ्यारंगाचा प्रकाश मानवी डाेळ्यांना दिसताे. या रंगाची व्हेवलेन्थ सर्वांत छाेटी आणि सर्वाधिक ऊर्जेची आहे. सूर्य हा निळ्या प्रकाशाचा मुख्य स्राेत असला, तरी डिजिटल डिव्हाइस हासुद्धा एक स्राेत आहे. सूर्य उगवल्यावर प्रकाश पडून आपण जागे हाेताे आणि ताे मावळताच अंधार हाेऊन आपल्याला झाेप येऊ लागते. मेलाटाेनिन त्यामागे असते, असे त्या म्हणाल्या.