महाराष्ट्राच्या विकासात डॉ. पतंगराव कदम यांचे योगदान मोलाचे

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे गौरवोद्गार; डॉ. कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    07-Sep-2024
Total Views |
 
 
ra
 
कडेगाव (सांगली), 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
‘डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणासह विविध क्षेत्रांत उत्तम काम करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. महाराष्ट्राच्या विकासाबरोबच काँग्रेसच्या विचारधारेबरोबर राहून त्यांनी पक्षाला ताकद दिली,' असे गौरवोद्गार लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी काढले. राज्याचे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी टेंभूचे शिल्पकार, भारती विद्यापीठाचे कुलपती, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व ‌‘लोकतीर्थ' या स्मारकाचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवारी (5 सप्टेंबर) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (मोहनराव कदम नगर, वांगी) येथे झाले. त्या वेळी गांधी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे होते.
 
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, डॉ. पतंगराव कदम प्रतिष्ठान व डॉ. पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कडेगाव (जि. सांगली) येथील भारती विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या आवारात हा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ग्रंथालयाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले; तर क्रीडागृहाला पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असून, त्यांचे नामकरणही या प्रसंगी करण्यात आले.
 
माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, विजयमाला कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत, स्वप्नाली विश्वजीत कदम, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील मंचावर उपस्थित होते.
 
 

ra1 
 
विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‌‘डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षकी पेशातून आपल्या आयुष्याची सुरुवात केली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 60 वर्षांपासून कदम कुटुंबीय काँग्रेसशी जोडले गेले आहे. कठीण परिस्थितीतही काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम व मोहनराव कदम यांनी जिवाचे रान केले. दुष्काळी भागाचे डॉ. कदम यांच्यामुळे अक्षरश: नंदनवन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी मोलाचे काम केले.' नाना पटोले यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. विशाल पाटील यांनी आभार मानले.
 
अध्यक्षपदावरून बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‌‘डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. गरिबांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपले कार्य केले. त्यांनी शिक्षणक्षेत्राचा विस्तार सांगलीपासून दिल्लीपर्यंत केला. डॉ. विश्वजीत कदम हे डॉ. पतंगराव कदम यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आहेत.'
 
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, ‌‘महाराष्ट्राच्या विकासात सातारा, सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी समाजातील प्रत्येक घटकातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी दूरदृष्टी ठेवून शिक्षणसंस्था सुरू केल्या. या भागातील पाण्याची गरज ओळखून त्यांनी अनेक प्रकल्प उभारले. त्यामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. तीच परंपरा विश्वजित कदम पुढे नेत आहेत.'
 
माणसातील लोकनेता अशी ओळख असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृती जागवणाऱ्या या सोहळ्यास सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातून डॉ. पतंगराव कदमप्रेमींची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. त्यात शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य-कला, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता.