महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श : राष्ट्रपती मुर्मू

    06-Sep-2024
Total Views |

Murmu
 
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजनेसह सुरू असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे काैतुक केले.येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ याेजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याेजना आणि शासन आपल्या दारी याेजना कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी राष्ट्रपतींनी राज्याच्या देदीप्यमान इतिहासाचे काैतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
 
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसाेडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित हाेते.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजना कायम राहणार आहे. माझी एकही बहीण या याेजनेपासून वंचित राहणार नाही आणि माताभगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजारांची रक्कम वाढवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य, देशाच्या विकासासाठी आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्व जण प्रयत्नरत असून, काेणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. फडणवीस, तटकरे, बनसाेडे यांनीही मनाेगत व्यक्त केले.राज्यपालांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट देण्यात आली. राष्ट्रपती व राज्यपालांच्या हस्ते महिलांना लाभवाटप करण्यात आले.