म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत लांबणीवर

    04-Sep-2024
Total Views |
 
 
,mh
 
 
मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबरला काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेसाठी किमान 45 दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता मुंबई मंडळाने या प्रक्रियेसाठी केवळ 26 दिवसांचा कालावधी दिला होता. हा कालावधी कमी असल्याने निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता करू न शकणारे इच्छुक सोडतीपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेत म्हाडाने मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता 4 सप्टेंबरऐवजी इच्छुकांना 19 सप्टेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहेत.
 
सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. मुंबईतील विविध ठिकाणच्या 2030 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत मंडळाने 9 ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सोडत काढण्याची घाई केली जात होती. त्यामुळे म्हाडाने घाईत निर्णय घेत आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीने 15 सप्टेंबरपूर्वी सोडतीचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्जविक्री-स्वीकृतीसाठी 9 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यानचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी कमी असल्याने अधिवास, उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे कशी उपलब्ध होणार, हा प्रश्न अनेक इच्छुकांसमोर उभा ठाकला. त्यामुळेच सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचेही चित्र आहे.
 
या सर्व पार्श्वभूमीवर तसेच आचारसंहिता लांबणीवर पडल्याने म्हाडाने 13 सप्टेंबरची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेत अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली. अर्जविक्री-स्वीकृतीला 15 दिवसांची अर्थात 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सावे यांनी सांगितले.