पिंपरी, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
काळेवाडीत गटार साफसफाई करताना मॅनहोलमध्ये उतरलेल्या ठेकेदाराकडील सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दहा लाखांचा विमा निधी अर्थसाह्य मिळून देण्यात आले. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती दिली. चरण म्हणाले, भरत डावकर हे महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. 13 सप्टेंबर 2017 रोजी मॅनहोलमध्ये काम करत असताना त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर डावकर कुटुंबीयांनी संपर्क साधला.
हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध व सफाई कामगारांचे पुनर्वसन कायदा-2013 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 व 2023 च्या निर्देशानुसार कार्यरत कामगार कामाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई, आरोग्य विभाग सफाई कर्मचारी स्थायी नोकरी, 10 लाख विमा निधी, मोफत घर व इत्यादी पुनर्वसन करण्याची तरतूद आहे. त्याचा आधार घेत आयुक्तांना नोटीस बजावली. त्या अनुषंगाने याआधी मृत्यूमुखी पडलेले डावकर कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई, वारस सागर डावकर याला पिंपरी पालिकेत सफाई कर्मचारी स्थायी नोकरी मिळाली.
इतर प्रलंबित मागण्या असल्यामुळे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली. त्याची दखल घेत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक व सुनावणी घेत मृत्युमुखी कामगाराच्या कुटुंबीयांना 10 लाखांचे विमा निधी अर्थसाह्य, मोफत घर व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. आयुक्त शेखर सिंह यांनी सफाई ठेकेदाराला 10 लाख रुपयांचे विमा निधी अर्थसाह्य देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयुक्तांनी दहा लाखांचा धनादेश डावकर कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.