पिंपरी, 3 सप्टेंबर (आ.प्र.) :
जर सांगतो एकात्मता पाळायला आता इथे! ना लागतो मुद्दा तरी भांडायला आता इथे! ना सोडले स्वार्थात धर्माच्या, तिरंग्याला कुणी! ते रंगही तर घेतले वाटायला आता इथे! ही गझल आहे रेवती साळुंके यांची. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आयोजित गझल दरबारचे. त्यावेळी ज्येष्ठ गझलकार हिमांशू कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, प्रमुख पाहुणे गझलकार म. भा. चव्हाण, उद्योजक अजय लोखंडे, विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ उपस्थित होते. पूर्वार्धापासून उत्तरार्धापर्यंत रंगत गेलेल्या या गझल दरबारात एकाहून एक सरस, आशयपूर्ण गझल पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या गझलकारांनी सादर केल्या.
त्यामध्ये गझलकार संदीप जाधव, बबन धुमाळ, राजेंद्र घावटे, निलेश शेंबेकर, सुहास घुमरे, डॉ. मीनल लाड, प्रदीप तळेकर, वैशाली माळी, संजय सिंगलवार, किरण जोशी, मोहन जाधव, रेखा कुलकर्णी, दिनेश भोसले, अशोक कोठारी यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात हिमांशू कुलकर्णी यांच्या ‘दंव भिजली वही' आणि ‘व्याकूळ पिंपळ' या दोन गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले. उल्हासनगर येथून आलेले उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित राहून त्यांची संपादित केलेली पुस्तके त्यांनी परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांना सुपूर्त केली. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात काही रुबाया, तर रसिकांच्या आग्रहास्तव त्यांची गाजलेली... थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा अंधार फार झाला ही गझल सादर केली. म. भा. चव्हाण, आणि अजय लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. नीलेश शेंबेकर, तसेच जयश्री श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले. किरण लाखे, किशोर पाटील, श्रीकांत जोशी, इला पवार, बाळासाहेब गोरे, प्रकाश शेंडगे यांनी संयोजन केले.