फुरसुंगी, उरूळी देवाची गावे महापालिकेतून वगळली

    13-Sep-2024
Total Views |
 
 
ma
 
पुणे, 12, सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांपैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची ही दोन गावे वगळून या दोन गावांची एकत्रित स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा अध्यादेश बुधवारी अखेर शासनाने जाहीर केला. नवीन नगर परिषदेची रितसर रचना होईपर्यंत पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने दिले आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची एकत्रित नगर परिषद करताना महापालिकेच्या मालकीचे या गावांतील कचरा डेपोचे क्षेत्र वगळण्यात आले आहे.
 
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारने 2022 मध्ये महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांपैकी देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा आणि या दोन गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने महापालिकेत या गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर महापालिकेने नजीकच्या हडपसरच्या दरानुसार येथील मिळकतींना कर आकारणी केली. हा कर ग्रामपंचायतीपेक्षा अधिक असल्याचा आरोप करत माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेऊन ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची मागणी केली होती. या बैठकीतच शिंदे यांनी स्वतंत्र नगर परिषद करण्याची घोषणा केली होती.
 
31 मार्च 2023 ला शासनाने प्रत्यक्षात ही गावे वगळण्यासाठी अधिसूचना काढून इरादा जाहीर केला. यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. टी.पी.स्कीम नगर परिषदेकडे जाणार महापालिकेने फुरसुंगी आणि देवाची उरूळीमध्ये पाच टी.पी.स्कीमची आखणी केली आहे. यापैकी देवाची उरूळी येथील सुमारे 700 एकरवरील दोन टी.पी.स्कीमचे काम अंतिम टप्प्यात आहे. या टी.पी.स्कीमदेखील नगर परिषदेकडे जाणार आहेत. या टी.पी.स्कीममधील रस्ते, ड्रेनेजलाइन, पाणीपुरवठा आदी नागरी सुविधांसाठी महापालिकेने नियोजनही केले आहे. परंतु, हा भाग आता नगर परिषदेकडे जाणार असल्याने या स्कीमचे काम आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
फुरसुंगी, उरूळी देवाची गावातील वगळलेला भाग
फुरसुंगीमधील स.नं.193, 192, 194 व 195 पैकी काही कचरा डेपोचा भाग, उरूळी देवाचीमधील स.नं.30, 31 व 32 मधील कचरा डेपोचा भाग हा महापालिकेच्या मालकीचा असून, पुणे शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी हा भाग पुणे महापालिकेतच राहणार आहे.
 
अशी असेल फुरसुंगी-देवाची उरूळी नगर परिषदेची हद्द
पूर्व दिशेला लोणीकाळभोर गावाची शीव, पश्चिमेला औताडेवाडी, वडाचीवाडी व हडपसरची शीव, दक्षिणेला वडकी आणि शेळकरवाडीची गावाची शीव आणि उत्तरेला हडपसर, शेवाळेवाडी आणि लोणी काळभोर गावाची शीव.