गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत झोपडपट्टीचे त्याच जागेवर पुनर्वसन

    13-Sep-2024
Total Views |
 
 
sra
 
पुणे, 12 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत इंदिरानगर येथील महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे एसआरएअंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. या ठिकाणी अडीच हजारांहून झोपड्या असून, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. लवकरच निविदा काढण्यात येईल. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात प्रथमच एसआरए पुणे महापालिकेसोबत योजना राबवत आहे.
 
गुलटेकडी येथील नेहरू रस्ता आणि महर्षिनगरच्या मध्ये तब्बल 12 एकर जागेवर मीनाताई ठाकरे इंदिरानगर ही मोठी वसाहत आहे. या ठिकाणी एसआरएअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यामध्ये दोन हजार 554 झोपड्या आढळल्या आहेत. जागेची मोजणी, डिमार्केशन आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी एसआरए योजनेसाठी विकसक सर्वेक्षण करायचे; परंतु यंदा प्रथमच महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
 
येत्या 19 सप्टेंबरपासून येथील नागरिकांकडून कागदोपत्री पुरावे गोळा करण्यासाठी महापालिकेतील 45 आणि बिबवेवाडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, उपायुक्त चेतना केरूरे यांच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्टीतच पाच ठिकाणी नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याची आणि पुरावे गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; तसेच या कामासाठीची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पाला आणखी गती मिळेल, असे या प्रकल्पासाठी नेमलेले विशेष अधिकारी सुधीर कदम यांनी सांगितले.
 
45 मीटरचे टॉवर उभे राहणार :
झोपडपट्टीच्या जागेवर टीपी आणि महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ते, उद्यान आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरक्षण आहे. या प्रकल्पामुळे या आरक्षणांची जागा मोकळी होणार असून, पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात साधारण अडीच हजार झोपड्या आढळल्या असल्या तरी काही दुमजलीदेखील आहेत. अशा दुमजली झोपड्यांचे 2000 पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरून त्यांची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार असल्याने संख्या वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 45 मीटर उंचीच्या 17-18 मजली साधारण बारा ते तेरा इमारती उभ्या राहतील. निविदेतील अटींनुसार अधिकाअधिक घरे देणाऱ्या व निविदांच्या अटीशर्तींनुसार महापालिकेला मोबदला देणाऱ्या विकसकाला हे काम देण्यात येईल. त्याबदल्यात विकसकाला टीडीआर, एफएसआय आणि त्याच्या प्रकल्पाच्या विकसनाला जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सुधीर कदम यांनी दिली.