पुणे, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
केंद्र आणि राज्य शासनाने देशभरातील 12 किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश' अंतर्गत जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. या अनुषंगाने युनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणार आहे. या नामांकनाच्या प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी शहरासह जिल्ह्यात गड, किल्ल्यांची प्रतिकृती बनवणे, आर्किटेक्चरल दस्तावेजीकरण करणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या 2024-25 साठीच्या यादीसाठी केंद्राने मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या 12 किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना स्थान मिळण्यासाठी नामांकन दिले आहे. त्यात शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खांदेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणींत होत असते. राज्यातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. ‘युनेस्को'ची समिती 27 ते 30 सप्टेंबर या काळात पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देणार आहे. त्यापूर्वी या नामांकनाच्या प्रचार, प्रसार, जनजागृतीसाठी गड-किल्ले प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला एक लाख, द्वितीय 50 हजार, तर तृतीय क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गाव, शाळानिहाय प्रत्येकी एक गड-किल्ले प्रतिकृती सादर करण्यास मर्यादा आहे.
उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या गावांपैकी पाच गावांना जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तालुकास्तरावर निवड झालेले तीन विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेला पात्र होतील. यामध्ये प्रथम येणाऱ्यांना पाच लाख, द्वितीय अडीच लाख, तर तृतीय क्रमांकाला सव्वा लाखांचे पारितोषिक असेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नामांकनाच्या प्रचार, प्रसारासाठी शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये, ऐतिहासिक संशोधन संस्था, वास्तुविशारद संस्था, गिरिप्रेमींच्या सहभागातून वास्तुरचना (आर्किटेक्चरल) दस्तावेजीकरण स्पर्धाही आयोजिण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली.