एरोमॉलमध्ये कॅबसाठी आता वाट पाहावी लागणार नाही

वाढत्या विमान प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सेवा सुरू

    10-Sep-2024
Total Views |
 
 
er
 
लोहगाव, 9 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
विमान प्रवाशांना कॅबसाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून विमानतळ प्रशासनाने एरोमॉलमध्ये पिन आधारित कॅब सेवा सुरू केली. ही सेवा सध्या दुसऱ्या मजल्यावरून सुरू आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच एरोमॉलच्या पहिल्या मजल्यावर देखील कॅबची सेवा सुरू होणार आहे. सध्या याची चाचणी सुरू असून, येत्या काही दिवसांत पहिला मजलादेखील कॅबसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना कॅबसाठी वाट पाहावी लागणार नाही. याचा किमान तीन हजार प्रवाशांना फायदा होईल, असा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे.
 
सध्या एरोमॉलमधून मिळणारी कॅब सेवा ही दुसऱ्या मजल्यावर उपलब्ध आहे. प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर येथे थांबणेदेखील अवघड होते. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीची विभागणी करण्यासाठी व तसेच कॅबची वाट पाहावी लागू नये, याकरिता पहिल्या मजल्यावर देखील कॅबसेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे आता एरोमॉलच्या दोन्ही मजल्यांवर प्रवाशांना कॅब सेवा उपलब्ध असणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. प्रवाशांना कॅबची वाट पाहावी लागू नये, याकरिता हा निर्णय घेतला आहे.
 
एरोमॉल दृष्टिक्षेपात
कॅबची दैनंदिन ये-जा : 12000
दररोज प्रवासी वाहतूक : 9 हजार
प्रवाशांकडून पिनसेवेचा वापर : 30 टक्के
 
पहिल्या मजल्यावरून देखील कॅब सेवा सुरू
प्रवाशांना कॅबसाठी थांबावे लागू नये म्हणून यापूर्वीच पिन आधारित सेवा सुरू केली आहे. आता पहिल्या मजल्यावरून देखील कॅब सेवेला सुरुवात करीत आहोत. सध्या याची चाचणी सुरू आहे. प्रवाशांना दोन्ही ठिकाणांवरून कॅब उपलब्ध होतील.
                                                                                                    -व्ही. रजपूत (उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ)
 
पिन आधारित सेवा प्रवाशांसाठी फायद्याची
1) पूर्वी कॅब बुक करताना प्रवाशांना बराच वेळ थांबावे लागत होते. आता वाट पाहावी लागणार नाही. प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
2) विमानतळापासून जवळचे ठिकाण असले तरीही कॅबचालकांना प्रवाशांना इच्छित स्थळी सोडणे अनिवार्य आहे.
3) या सेवेत कॅबचालकांना कुठे जायचे आहे, हे आधी समजत नाही. प्रवासी गाडीत बसल्यावर लोकेशन कळते. त्यामुळे जवळचे ठिकाण असले तरीही कॅबचालकांना बुकिंग नाकारता येणार नाही.