महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात माेलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन हाेत आहे.वाढवण बंदर राज्याच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे. या बंदरामुळे जगातील पहिल्या दहा कंटेनर पाेर्टच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट हाेणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात माेठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, 12 लाखांपेक्षा जास्त युवकांना राेजगार मिळणार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.सुमारे 76200 काेटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ; तसेच 1563 काेटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व याेजनांचे लाेकार्पण व शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडकाे मैदानात आयाेजित कार्यक्रमात झाले.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद साेनाेवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनूठाकूर, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास मंत्री संजय बनसाेडे आदी मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्थानिक मच्छिमार, शेतकऱ्यांना ट्रान्सपाॅड व किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले.स्वतंत्र भारतातील सर्वांत माेठ्या बंदराची पायाभरणी हाेत आहे. या बंदराच्या निर्मितीमुळे स्थानिकांना राेजगार आणि देशाला व्यापार उपलब्ध हाेणार आहे.
हे जगातले आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवासुविधांनी परिपूर्ण असे बंदर असणार आहे. या बंदराच्या निर्मितीत एक लाख लाेकांना राेजगाराची संधी मिळेल; तसेच हे बंदर पूर्णततयार झाल्यानंतर दहा ते बारा लाखांहून अधिक राेजगार निर्माण हाेतील, असे साेनाेवाल यांनी सांगितले.मुंबईला वसई-विरारशी जाेडण्यासाठी वाढवण बंदर मुख्य भूमिका बजावेल. त्यासाठी वाढवण बंदराजवळ विमानतळाची मागणी यावेळी फडणवीस यांनी केली.वाढवण बंदराच्या निर्मितीपासून ते तयार झाल्यानंतर तिथल्या स्थानिक मच्छिमार आणि आदिवासी बंधू- भगिनींनाच नाेकऱ्या देण्यात येतील, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. वाढवण बंदराचा फायदा महाराष्ट्राला हाेणारच आहे, त्याचबराेबर संपूर्ण देशालाही या बंदराचा फायदा हाेईल, असे पवार यांनी सांगितले.