ॲड. हर्षद निंबाळकर मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील

07 Aug 2024 13:18:36
 
 
ad
पुणे, 6 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील 28 वकिलांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्यात पुण्यातील ज्येष्ठ वकील ॲड. हर्षद निंबाळकर यांचीदेखील नियुक्ती झाली. मूळचे पुण्यातील असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून येथे प्रॅक्टीस करत असलेले व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झालेले ते जिल्ह्यातील पहिलेच वकील ठरले आहेत. अधिवक्ता कायद्यानुसार या वकिलांची नियुक्ती उच्च न्यायालयाने केली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता, वरिष्ठ वकिलांसह पाच जणांच्या कमिटीने ही नियुक्ती केली.
 
निवड करताना अर्जदार वकिलांचे विविध निकाल, त्यांनी केलेले लिखाण आणि विविध ठिकाणी केलेले मार्गदर्शन याची नोंद घेतली जाते. त्यानंतर मुलाखतीत निवड झालेल्या वकिलांची नावे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसमोर सादर केली जातात. त्यानंतर निवड जाहीर केली जाते. ॲड. निंबाळकर यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्येसह विविध खटल्यांत त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले आहे.
 
पुणे जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे. त्यामुळे पुणे बार असोसिएशन आणि माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या ठिकाणी प्रॅक्टीस करत असलेल्या वकिलांची नियुक्ती झालेली आहे. या निवडीमुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या कामाला आणखी प्रेरणा मिळाली आहे.
                                                                                                                                                        -ॲड. हर्षद निंबाळकर
Powered By Sangraha 9.0