संध्यानंद.काॅम
भारतासारख्या देशात कार ही अजूनही चैनीची वस्तू असली, तरी अनेकांसाठी ती आता गरज झाल्याचे दिसते. नाेकरी-व्यवसायानिमित्त करावा लागणारा लांबचा प्रवास, रस्त्यांची दयनीय स्थिती, पाऊस आणि उन्हाचा तडाखा आदी समस्यांतून काही प्रमाणात सुटका हाेण्यासाठी कार वापरणे साेईचे ठरते. सध्याच्या काळात हवामानाची कसलीच खात्री नसल्याने कारमध्ये वातानुकूलन यंत्रणा (एसी) हा एक आवश्यक घटक झाला असून, खराब रस्त्यांवरही चालणारे उत्तम टायर ही दुसरी महत्त्वाची बाब आहे. उष्म्याच्या लाटेत भर दुपारी तुम्ही जात असताना कारचा एसी बंद पडल्याची कल्पना करा किंवा मुसळधार पाऊस अथवा बर्फवृष्टी हाेत असताना कारचे टायर रस्त्यावर व्यवस्थित पकड घेत नसल्याची कल्पना करा.या दाेन्ही स्थितीत तुम्हाला जाेखमीला सामाेरे जावे लागेल. हवामानातील बदलांमुळे अशी स्थिती आता वारंवार निर्माण हाेण्याची श्नयता वाढली आहे.
भारतात यंदाचा उन्हाळा अतितीव्र हाेता. वायव्य आणि पूर्व भारतात सरासरी कमाल तापमान 47-48 अंश सेल्सिअसच्या आसपास हाेते. 30 मे केरळमध्ये माॅन्सूनचे आगमन हाेईपर्यंत उत्तर भारतातील बहुतेक शहरे उष्म्याने हाेरपळत हाेती.उन्हाळ्यापासून सुटका झाल्याचे समाधान फार काळ टिकले नाही. आता पावसाने त्याचे रूद्र स्वरूप दाखवणे सुरू केले आहे.दक्षिण भारत आणि हिमाचल प्रदेशासारख्या डाेंगराळ राज्यांत पावसामुळे महापूर, दरडी काेसळणे आदी संकटे येऊ लागली आहेत. ढगफुटीमुळेही नुकसान हाेत आहे.ही सर्व ‘मानवनिर्मित’ संकटे असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. भारतात एक जूनपासून आतापर्यंत सरासरीपेक्षा तीन टक्के पाऊस जास्त झाला आहे.या सगळ्या स्थितीचा विचार वाहन उद्याेगही करत आहे.
कारमधील एसी आणि तिचे टायर या टाेकाच्या हवामानाला सामाेरे जाण्यासाठी सज्ज असण्याची गरज असून, वाहन निर्माते त्यावर काम करायला लागले आहेत. विद्युत वाहनांचा (इव्ही) वापर वाढत असण्याच्या सध्याच्या काळात नवीन तंत्रज्ञानही स्वीकारावे लागणार आहे. त्यासाठी कारच्या एसींची निर्मिती करणारे उद्याेजक सध्या या एसींच्या कसून चाचण्या करत आहेत.
अगदी टाेकाच्या हवामानात ताे चालविणे, प्रदीर्घ काळ वापरल्यावर काय परिणाम हाेताे ते तपासणे आदी चाचण्या केल्या जात आहेत. यापुढे हवामानात टाेकाचे बदल हाेत जाणार असल्याने त्यांना सामाेरे जाण्यासाठी या सिस्टीम तयार असणे आवश्यक असल्याचे कार एसीच्या क्षेत्रात देशात सर्वांत माेठ्या असलेल्या सुब्राेस या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रद्धा सुरी मारवा यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘भारतासाठी उत्पादने तयार करताना आम्ही येथील हवामानाचे वैविध्य विचारात घेताे. आमच्या उत्पादनांची उणे (मायनस) 20 अंश ते अधिक (प्लस) 50 ते 55 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानावर आम्ही चाचणी करताे. तापमानाचे हे प्रमाण जगभरात उणे 30 ते अधिक 30 अंश सेल्सिअस असते. पण, भारतात तापमानातही वैविध्य असल्याने टाेकाच्या हवामानातही आमची उत्पादने कार्यक्षम राहण्यावर आमचा भर असताे.52 अंश सेल्सिअस तापमानात आम्ही जैसलमेरमध्ये एसीची चाचणी केली. हवामानातील बदल जाणवायला लागल्यामुळे एसीच्या चाचण्या अधिक कठाेर करण्याची गरज आहे.
कडक हिवाळा आणि लांबणारा पाऊस या स्थितीत एसींची कार्यक्षमता कायम राहण्यासाठी आम्ही आता चाचण्या सुरू करणार आहाेत.’ हवामान अधिक वाईट हाेत असल्याने एसीमधील रबर, अॅल्युमिनियम आणि पाेलादासारख्या घटकांच्या गुणवत्तेकडेही जास्त लक्ष द्यावे लागेल, असे त्या सांगतात. नवीन उत्पादने वजनाला हलकी, ऊर्जास्नेही आणि जास्त कार्यक्षम असण्याची गरजही श्रद्धा सुरी मारवा यांनी व्यक्त केली.रस्त्यावर कारची पकड ठेवणे आणि तिला गती देण्यात टायरची भूमिका महत्त्वाची असते. नैसर्गिक रबराच्या गुणवत्तेबाबत टायर निर्मात्यांना काळजी वाटते.
हवामानातील बदलांमुळे रबराचे उत्पादन घटत असून, त्याचा परिणाम टायरच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या संख्या आणि गुणवत्तेवर हाेत आहे.‘संततधार आणि टाेकाच्या तापमानामुळे नैसर्गिक रबराच्या उत्पादनाला फटका बसला आहे. बिघडलेल्या हवामानामुळे केरळमधील रबर उत्पादन यंदा 20-30 टक्के घटण्याची श्नयता आहे. बदलत्या हवामानामुळे रबरावर कीड पडूनही नुकसान हाेत आहे,’ अशी माहिती केरळ राज्य रबर सहकारी संस्थेचे प्रमुख जेकब मॅथ्यू यांनी दिली. सध्या कंपन्यांकडे पुरेसा साठा असल्याने यंदा टायरच्या दरांत फार बदल हाेणार नसला, तरी पुढील वर्षी ताे हाेऊ शकताे. मात्र, कमी उत्पादन हेच टायरच्या दरवाढीचे एकमेव कारण नसेल, असे ते म्हणाले.