माजी आमदार विनायक निम्हण स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

    01-Aug-2024
Total Views |
 
 
vi
पुणे, 31 जुलै (आ.प्र.) :
 
सोमेेशर फाऊंडेशन व क्रीडा जागृती आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत राज्यभरातून अव्वल मानांकित 212 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, सनी रिसॉर्ट, पाषाण-सूस रोड या ठिकाणी 2 ऑगस्ट 2024 पासून रंगणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज्‌‍ वर्ल्डचे चेअरमन व सोमेेशर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, सलग दुसऱ्या वर्षी विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा आणि मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले की, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षीदेखील या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता. यावर्षीदेखील या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात 180 खेळाडूंनी, तर महिला एकेरी गटात 32 खेळाडूंनी भाग घेतला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात 58 गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या महंमद घुफ्रान याला, तर महिला एकेरी गटात 75 गुण मिळवून आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
 
2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होणार असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी नमूद केले. सोमेेशर फाऊंडेशनचे उमेश वाघ यांनी सांगितले की, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धे चेदेखील आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 9 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, सनी रिसॉर्ट, पाषाण-सूस रोड या ठिकाणी पार पडणार असून, यामध्ये जिल्ह्यातून 400 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि मानद सचिव रणजित नातू यांच्या सहकार्याने व मान्यतेने ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी सनीज वर्ल्ड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.