िरक्षाचालकांना मदत म्हणजे ‌‘मनी सेव्ह इज मनी अर्न्ड'

    09-Jul-2024
Total Views |
 
riks
 
कोथरूड, 8 जुलै (आ.प्र.) :
 
‘रिक्षाचालक हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांना अतिशय खडतर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे रिक्षाचालकांना मदत म्हणजे एकप्रकारे त्यांच्यासाठी मनी सेव्ह इज मनी अर्न्ड आहे,' असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले; तसेच आगामी काळात कोथरूडमधील रिक्षाचालकांना आपल्या वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामातही मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
 
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूडमधील 1000 रिक्षाचालकांना शिलाईसह गणवेश वाटप करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ आज डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश वर्पे, कोथरूड मतदारसंघ समन्वयक गिरीश भेलके, रिक्षाचालक आघाडीचे अध्यक्ष सुनील मालुसरे, निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, नगरसेवक किरण दगडे पाटील, माजी स्वीकृत नगरसेविका मिताली सावळेकर, मंडल सरचिटणीस विठ्ठल बराटे, दीपक पवार, गिरीश खत्री, प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ, प्रशांत हरसुले, विशाल रामदासी, बाळासाहेब टेमकर, प्राची बगाटे, आशुतोष वैशंपायन यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‌‘रिक्षाचालक हे आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यांना उदरनिर्वाहासाठी अतिशय खडतर परिश्रम करावे लागतात. कोविड काळात पुन्हा रिक्षा सुरू करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रिक्षा चालविण्यासाठी गणवेश अत्यावश्यक बाब बनवली आहे. मात्र, तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना गणवेशाच्या रूपाने मदत म्हणजे मनी सेव्ह इज मनी अर्न्ड आहे.' रिक्षाचालकांचे दर दिवशी सरासरी उत्पन्न अतिशय कमी असते. त्यामुळे रिक्षा नादुरुस्त झाल्यानंतर देखभाल- दुरुस्तीवर मोठा खर्च होतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम होतो. आगामी काळात कोथरूडमधील रिक्षाचालकांना आपल्या वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामातही मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सरचिटणीस पुनीत जोशी आणि डॉ. संदीप बुटाला यांनी आपल्या मनोगतात पाटील यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
 
कोथरूडमधील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, अशी चंद्रकांत पाटील यांची धारणा आहे. त्यामुळे असा लोकप्रतिनिधी कोथरूडसाठी मिळाला, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाचे आणि अभिमानाचे आहे. आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाटील यांनी कोथरूडकरांचे पालकत्वच घेतले आहे, अशी भावना पुनीत जोशी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन-सूत्रसंचालन गिरीश भेलके यांनी केले, तर सुनील मालुसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.