चऱ्होलीत खडीमशीन ते अलंकापुरमपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा

    09-Jul-2024
Total Views |
 
 
ch
पिंपरी, 8 जुलै (आ.प्र.) :
 
चऱ्होलीतील खडीमशीन ते अलंकापुरमपर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच खडी पसरली आहे. त्यातच आता पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा वाहन घसरण्याचे प्रकार होतात. अशाप्रकारच्या अपघाताच्या घटना गेल्या दोन दिवसांत झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 14 मेनंतर कुठल्याही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त खोदाईसाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे मोठ्या थाटात सांगितले. पावसाळ्यापूर्वी खोदाई केल्यामुळे अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार होतात. त्यामुळे कोणतीही खोदाई करू नये, असे सांगण्यात आले. मात्र आपल्याच आदेशाला हरताळ फासण्याचे काम प्रशासनामार्फत अगदी सोयीस्करपणे सुरू असल्याचे दिसत आहे.
 
पिंपरी महापालिकेच्या स्मार्ट सिटी आणि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने खडीमशीन ते अलंकापुरम रस्त्यापर्यंत पाइपलाइन टाकणे, केबलचे डक्ट व केबल लाइन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी खोदाई करण्यात आली. या खोदाईमुळे खडीमशीन ते अलंकापुरम रस्ता उखडला गेला. पावसामुळे खडीदेखील उखडली आहे. आता त्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अपघातांची मालिका ः मॅक्झिम चौकापासून चऱ्होली गावाकडे जाणाऱ्या आणि खडीमशीन चौक ते अलंकापुरम रस्त्यावर खड्डे दिसत आहेत. खडीमशीन चौकातील रस्त्यावर शुक्रवारी दुचाकी वाहनांचा अपघात झाला. या खड्ड्यांमुळे मागील वाहनाला अंदाज न आल्याने एका चारचाकी वाहनाला मागील वाहन धडकले. अशा अपघातांची मालिका सातत्याने बीआरटीमध्ये सुरू आहे.
 
नागरिकांची ओरड :
नुकत्याच झालेल्या जनसंवाद सभेतही चऱ्होली भागातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशी मागणी केली होती. संत ज्ञानेेशरनगर, साई मंदिर परिसर, गोखलेमळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, ताजणेमळा, चोविसावाडी, गायकवाडनगर, समर्थनगर, कृष्णानगर, तापकीर वस्ती, वडमुखवाडी या भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
 
खडीमशीन ते अलंकापुरम चौकापर्यंत पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीकडून केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. हे काम आता पूर्ण झालेले आहे. मात्र त्यामुळे काही प्रमाणात रस्ता खराब झाला. त्याबाबत तातडीने दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
                                                                                                                                 -शिवराज वाडकर, (कार्यकारी अभियंता)