स्वारगेट, 7 जुलै (वि.प्र.) :
पुण्याच्या मध्य वस्तीतील सर्वांत जुने असलेले आणि विविध मार्गांवर जाण्यासाठी सोयीचे असलेले स्वारगेट एसटी बस स्थानक सध्या रिक्षाचालकांच्या विळख्यात अडकले आहे. स्थानकाच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत रिक्षातळामुळे आणि रिक्षाचालकांच्या ‘दादागिरी'मुळे प्रवासी त्रस्त आहेत. याबरोबरच येथे येणाऱ्या एसटी बसचालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरात आरटीओचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यातच नाही, तर इतर राज्यांत जाण्यासाठी प्रवासी सेवा देणारे स्वारगेट बस स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. विशेषतः मुंबईसह कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाणाऱ्या प्रमुख बस या ठिकाणाहून सुटतात किंवा येतात. मात्र, स्वारगेट बस स्थानकाच्या दोन्ही ‘गेट'ना रिक्षाचालकांनी विळखा घातला आहे. या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होत असून, राज्य परिवहन महामंडळ अथवा पुणे आरटीओ कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करताना दिसत नाही. स्वारगेट एसटी बस स्थानकावर जाण्यासाठी शिवाजी रोडवरून सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक गेट आहे, तर दुसरे गेट शंकरशेठ रस्त्याकडून येते. या दोन्ही गेट जवळ या रिक्षाचालकांनी ठिय्या मांडला आहे. येथून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना अडवून ‘त्यांना कुठे जायचे आहे' असे विचारत ‘रिक्षा मिळवून देतो' असे म्हणत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली जात आहे.
‘आरटीओ'ची कारवाई का नाही? :
स्थानकाच्या हद्दीत होत असलेल्या अनधिकृत रिक्षातळावर ‘आरटीओ' कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मीटरप्रमाणे भाडे का नाही? :
या दोन्ही ठिकाणी रिक्षाचालक मीटरप्रमाणे पैसे न घेता त्यांच्या मनाला येईल तो आकडा सांगून प्रवाशांची लूट करीत आहेत. पुण्यात रिक्षाचे कुठेही प्रवास करायचा असेल तर आरटीओ नियमाप्रमाणे मीटर लागू आहे. पहिल्या दीड किलोमीटरला 25 रुपये आणि त्यानंतरचे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्याचा वापर इथे कुठेच होत नाही.
ट्रॅफिक पोलिसांचेही दुर्लक्ष :
स्वारगेट बस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. ट्रॅफिक पोलीस विभागाचे कार्यालयदेखील येथे आहे; पण स्थानकाच्या हद्दीत होणाऱ्या या अतिक्रमणावर किंवा वाहतूक कोंडीबाबत प्रशासन काहीच पावले उचत नाही, यामुळे प्रशासनावर शंका घेण्यात येत आहे.
स्थानकात बसगाड्या आणणेही कठीण :
गेटवरील रिक्षांच्या अतिक्रमणामुळे आणि गेटवरच रिक्षा थांबत असल्याने बस वळवणे आणि स्थानकात आणणे चालकांना मुश्कील होत आहे. हॉर्न दिला तरी रिक्षाचालक येथून त्यांच्या रिक्षा दूर करीत नाहीत. गेटवरच बस थांबवून प्रवाशांची अडवणूक स्थानकावरच या रिक्षाचालकांनी त्यांचा अनधिकृत रिक्षातळ केलेला आहे. बस आल्यावर रिक्षाचालक ती आत स्थानकात जाऊच देत नाहीत. तिथेच थांबवून प्रवाशांना उतरायला भाग पाडतात आणि प्रवासी बसमधून उतरू लागले की त्यांच्याभोवती ‘कुठे जायचे' विचारत कोंडाळे करतात. यामुळे बसमधून उतरलेले प्रवासी भांबावून जात आहेत. याचबरोबर गेटवरच एक बस थांबवली की तिच्यामागे इतर बसनाही आत जाण्यास मार्ग नसल्याने तिथे थांबावेच लागते, त्या बसभोवतीही रिक्षाचालक असेच कोंडाळे करतात.
रिक्षाचालकाच्या त्रासाने बसचालकही त्रस्त :
स्थानकाच्या गेटवरच बस थांबवून प्रवासी ‘पकडण्या'च्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे बसचालकही वैतागले आहेत. गेटजवळच कारण नसताना बस थांबवली जाते. त्यामुळे नियोजित बस थांबण्याच्या ठिकाणी बस नेणे अवघड होत आहे. अनेकवेळा त्यांना डावलून बस नेण्याचा प्रयत्न केला तर एकदा 10-12 रिक्षाचालक अंगावर येतात, त्यामुळे बसचालकांचा नाईलाज होतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका बसचालकाने सांगितले.
जेधे चौकातच उतरवले जातात प्रवासी :
रिक्षाचालकांच्या त्रासाला कंटाळून अनेक बसचालक त्यांच्या बस जेधे चौकाच्या (टिळक रस्ता, शंकरशेठ रस्त्यावर, कात्रजकडून येणाऱ्या बस) अलीकडेच बस थांबवतात आणि हाच ‘शेवटचा ‘स्टॉप आहे, येथून बस थेट डेपोत जाणार' असे सांगून प्रवाशांना मूळ स्थानकाच्या अलीकडेच उतरवले जाते. त्यामुळे या भागातही वाहतूक कोंडी होते आहे.
ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना करतात ‘टार्गेट' :
बसमधून उतरणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना घेऊन उतरणाऱ्या महिलांना या रिक्षाचालकांकडून टार्गेट केले जाते. त्यांच्या स्थितीचा फायदा घेत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रिक्षासाठी दर आकारले जात आहेत. त्यांना येथील रिक्षा नको असल्यास बाहेर येऊन रिक्षा करायची असल्यास ती रिक्षा हे रिक्षाचालक मिळू देत नाहीत.
अवघ्या दोन किलोमीटरसाठी 350 रुपये
स्वारगेट ते दगडूशेठ हलवाई मंदिर हे अंतर दोन किलोमीटरपेक्षाही कमी आहे. या ठिकाणी रिक्षाने जाण्यास 55 ते 60 रुपये मीटरने होतात; पण येथे जाण्यासाठी एका प्रवाशाकडून 350 रुपये मागण्यात आल्याचे एका प्रवाशाने सांगितले. ही घटना शुक्रवारी (दि. 28 जून) दुपारी 2 च्या दरम्यानची आहे.
उपनगरात जाण्यासाठी 500 ते 1 हजार
रुपये पुणे परिसरातील उपनगरांमध्ये जाण्यासाठी या रिक्षाचालकांकडून 500 पासून पुढे दर आकारले जात असून 1 हजारपर्यंतची मागणी केली जाते.
तरुणींना-महिलांना त्रास :
स्थानकावर नातेवाइकांना आणण्यासाठी अथवा प्रवासासाठी महिला येतात. त्यांना रिक्षाचालकांकडून त्रास दिला जात आहे. ‘रिक्षा नको आहे', असे सांगितले तरी पुनः पुन्हा येऊन त्यांना ‘रिक्षा हवी का' असे विचारत त्यांच्यासमोर विशिष्ट हावभाव करीत त्यांना त्रास दिला जात आहे. याकडे प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळा स्थानकावर लहान मुलांना कडेवर घेऊन महिला (तरुणी) येतात; मात्र त्यांनाही हे रिक्षाचालक त्रास देत त्यांच्या असाहयतेचा फायदा घेत आहेत.
‘ओला-उबेर'च्या चारचाकीही स्थानकात :
‘ओला-उबेर'च्या कार प्रवाशांना घेऊन स्थानकात येतात. त्या स्थानकाच्या गेटजवळच त्यांच्या गाड्या थांबवतात. या गाड्यांमधून प्रवासी त्यांचे सामान घेऊन उतरेपर्यंत गाड्या येथेच थांबतात. त्यामुळे मागून आलेल्या बसना आत प्रवास करणे अशक्य होते. इतकेच नाही, तर दुसरे प्रवासी ग्राहक मिळेपर्यंत या गाड्यांचे चालकही येथे गेटवरच थांबतात.
दुचाकीस्वारही स्थानकात :
स्थानकाच्या दोन्ही बाजूच्या गेटचा दुचाकीचालकांकडून सर्रास ये-जा करण्यासाठी वापर होत आहे. यावर प्रशासनाचे तर पूर्ण दुर्लक्ष होत आहे. दोन बसमधून दुचाकी काढताना काही तरी ‘थ्रील' केल्याच्या आविर्भावात जोरजोरात किंचाळत येथून दुचाकीस्वार (एका गाडीवर तन जण) जात आहे; पण त्यामुळे इतर बसचालक अथवा येथे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.