नदीकाठ सुधार योजनेमुळे पूरस्थितीच्याआरोपांत तथ्य नाही : महापालिका आयुक्त

    31-Jul-2024
Total Views |
 
maha
 
पुणे, 30 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
मुठा नदीपात्रामध्ये कर्वेनगर तसेच शिवणे येथे चार ते पाच एकर नदीकाठावर भराव टाकल्याप्रकरणी सहा जागामालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या ठिकाणी जेसीबी, डंपरसह आवश्यक यंत्रणा लावून दोनशेहून अधिक डंपर भराव हटविण्यात आला आहे. संबंधितांवर कारवाई केली असून, भराव काढण्याचा खर्चही वसूल करण्यात येईल. नदीकाठ सुधार योजनेमुळे पूरस्थिती निर्माण झाली, या आरोपामध्ये तथ्य नाही. पाटबंधारे विभाग आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेऊनच काम करण्यात येत आहे. यातूनही काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
 
आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले, की नदीला आलेल्या पुरामुळे बाधितांचे नुकसान झाले. त्याचे शंभर टक्के पंचनामे झाले आहेत. प्रामुख्याने विठ्ठलनगर, निंबजनगर, एकतानगर, पाटील इस्टेट, शांतीनगर, येरवडा, पुलाचीवाडी यासह चौदा ठिकाणी नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून, रोगराई टाळण्यासाठी औषधफवारणी देखील करण्यात आली आहे. पूरस्थितीनंतरची परिस्थिती नियंत्रणात आहे. धरणे ऐंशी टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर ठेवून दिवसा पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल.
 
ब्लू लाइनमधील बांधकामांचा प्रश्न न्यायालयाच्या आदेशानुसार सोडविला जाईल :
विठ्ठलवाडी परिसरातील काही सोसायट्या नदीपात्रातील ब्लू लाइन आणि रेड लाइनच्या एरियात आहेत. यापैकी बहुतांश सोसायट्यांना पूर्वीच्या येथील ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करणे उचित राहील. शांतीनगर झोपडपट्टीच्या लगत असलेल्या नाल्यातून नदीपात्रात पाणी येते. मुळा नदीला पूर येतो त्यावेळी नाल्यातून येणारे पाणी बॅक मारते आणि शांतीनगर वसाहतीमध्ये शिरते. यावर उपाययोजना करण्यात येतील. शांतीनगर येथे लगतच एसआरए योजनेचे कामही सुरू आहे. या वसाहतीतील नागरिकांचे या ठिकाणी स्थलांतर करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे.