हार्दिक अभिनंदन!

    03-Jul-2024
Total Views |
 
 
 
Hardik
 
हार्दिक पांड्याला गुजरातमधून आयात करून मुंबई इंडियन्सचा कप्तान बनवलं गेलं तेव्हा मुंबईकर आणि महाराष्ट्रातले इतर चाहते रुष्ट झाले हाेते. मुंबई बाॅय राेहित शर्मा याच्यावर ताे अन्यायच केला गेला हाेता आणि त्याबद्दल या पानावरही आपण हार्दिकची अगदी यथासांग आरती केली हाेती. हार्दिकचा मैदानावरचा वावर, त्याचं राेहितशी उर्मटपणे वागणं याने लाेक आणखी संतापत हाेते आणि हार्दिक आणखी ट्राेल हाेत हाेता. त्यात मुंबई इंडियन्सचा परफाॅर्मन्सही बाराच्या भावात गेला.या सगळ्या काळात हार्दिक मानसाेपचार घेत हाेता, व्यक्तिगत पातळीवर ताे कठीण काळातून चालला हाेता.
 
या पार्श्वभूमीवर त्याचा टी 20 वर्ल्ड कपच्या संघात समावेश झाला आणि त्याला फायनलपर्यंत खेळवलं गेलं. त्याचे त्याने फायनलमध्ये पांग फेडले. दक्षिण आफ्रिकेच्या डावाला शेवटी हादरे देणारा एक स्पेल त्याचाही हाेता.भारताने सामना जिंकला तेव्हा सगळेच खेळाडू रडले. पण, हार्दिकचे अश्रू स्पेशल हाेते. एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडेल असं ट्राेलिंग सहन करत असताना त्याने कधीही ताेंड उघडलं नव्हतं ती सगळी वेदना त्या संध्याकाळी बाहेर पडली. त्याच्या अनेक चुकांचं पापक्षालन झालं. हार्दिक कॅमेऱ्यासमाेर बाेलत असताना राेहितने एखाद्या माेठ्या भावाच्या ममतेने त्याच्या गालाचं चुंबन घेतलं हा एक भावनिक सुवर्णक्षणच हाेता.