उत्कृष्ट वेडिंग फाेटाेग्राफी करण्यासाठी उत्स्फूर्तता असणे महत्त्वाच

    29-Jul-2024
Total Views |
 
 

wedding 
 
लग्न करण्यासाेबतच ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. त्यामुळे लग्नासंबंधित खानपान सेवा, केशभूषा, वेशभूषा या सगळ्यालाच प्रचंड भाव प्राप्त झालेला आहे. त्यातही लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरानवरीइतकाच महत्त्वाचा असताे ताे छायाचित्रकार. त्यामुळेच लग्नाच्या छायाचित्रण व्यवसायाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये अतिशय उत्तम असे मानधनही मिळते.त्यामुळे आधीच्या काळी लग्नाचे काय फाेटाे काढताे म्हणून हिणवलं जात हाेतं पण आता मात्र तसं राहिलेलं नाही. वेडिंग फाेटाेग्राफीही करियरची वाट तयार झाली आहे.
 
1. फाेटाे काढण्यासाठी आवश्यक काैशल्य : लग्नाआधी, लग्नामध्ये, लग्नानंतर वधू-वर आणि जमलेल्या पाहुण्यांची अतिशय नैसर्गिक, अकृत्रिम छायाचित्रे काढणे ही नवी व्याख्या आता रूढ हाेत आहे. यामध्ये फक्त कार्यालयात किंवा घरातच नव्हे तर घराबाहेरही छायाचित्रे काढली जातात.यामध्ये छायाचित्रकाराला आपली एक शैली विकसित करावी लागते.त्यासाठी सुरुवातीला छायाचित्रणातील मूलभूत बाबी समजून घ्याव्या लागतात. त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रकाशयाेजना आणि छायाचित्रण तंत्रावरील काही कार्यशाळांतून त्याचे ज्ञान घ्यावे लागते.
 
2. उत्स्फूर्तता महत्वाची : वेडिंग फाेटाेग्राफी करण्यासाठी फाेटाेग्राफरने उत्स्फूर्त असायला हवे. लाजणारा, अबाेल छायाचित्रकार इथे उपयाेगाचा नाही. त्याने एक तर वधू-वर आणि पाहुण्यांच्या नकळत त्यांचे भाव टिपायला हवेत किंवा बाेलून त्यांना खुलवायला हवे, त्यांची छायाचित्रकाराशी मैत्री झाल्याशिवाय नैसर्गिक भाव असलेले छायाचित्र मिळणे कठीण हाेते.
 
3. संयम हा गुण आवश्यक आहे : वेडिंग फाेटाेग्राफरसाठी प्रचंड संयम हवा. सर्व प्रकारच्या लाेकांशी जमवून घेण्याचे तंत्र त्याला जमले पाहिजे. समारंभात माेकळेपणाने वावरता आले पाहिजे. या प्रकारात फाेटाेग्राफरला सर्वच प्रकारची यंत्रसामग्री विकत घेणे गरजेचे नाही तर काही वेळा ती त्याला भाडयानेही आणता येते.
 
4. स्पर्धा खूप : पण या क्षेत्रात खूपच स्पर्धा आहे. तशी ती सर्वच क्षेत्रांत आहे, पण वेडिंग फाेटाेग्राफीमध्ये ती जरा जास्तच आहे. कारण हे काम नाजूक आहे. त्यामध्ये ग्राहकांच्या भावना गुंतलेल्या असतात. एक वेळ औद्याेगिक किंवा खाद्यचित्रणामध्ये तुम्हाला एखादा फाेटाे परत घेता येईल. पण लग्नाचे तसे नाही. ती वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे वधूवरांचे ते भाव टिपणे, त्या वेळी साधायलाच हवे.
 
5. कल्पकता महत्वाची : प्रेमापासून लग्नापर्यंतचा एखाद्या जाेडप्याचा प्रवास दाखवताना छायाचित्रकाराला कल्पकता वापरायला हवी. जेणेकरून या गाेड आठवणींचा एक देखणा संग्रह तयार हाेईल.प्री-वेडिंग शूट आणि वेडिंग शूट आवडल्यास काही जाेडपी हनिमून शूटसाठीही त्याच छायाचित्रकाराला विचारणा करतात. कारण हल्ली प्रीवेडिंगप्रमाणेच हनिमून शूटचीही हाैस वाढत आहे.
 
6 स्वत:ची टीम तयार करा : आता वेडिंग फाेटाेग्राफी हे एका माणसाचे काम राहिलेले नाही. किमान 2-3 फाेटाेग्राफर एकत्र येऊन ते करतात. म्हणजे कुणी वधू-वरांचे फाेटाेज काढताे कुणी पाहुण्यांचे, कुणी सजावटीचे. कारण लग्नसमारंभ माेठा झाल्याने एका माणसाला सगळीकडे धावाधाव करणे शक्य हाेत नाही. लग्न जर आणखीच भव्य-दिव्य असेल तर चक्क 12-15 फाेटाेग्राफरही त्यासाठी टीम म्हणून काम करतात.
 
7. घरांनुसार फाेटाेग्राफीचे स्वरूप ठेवावे लागते : लक्षात ठेवायची आणखी गाेष्ट म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्हाला तुमच्या कामात बदल करावा लागताे. काही घरांमध्ये परंपरांना महत्त्व असते, तर काही घरांमध्ये साजरीकरणाला स्थान असते. त्या त्या घराप्रमाणे त्यांच्या त्या समारंभाची उत्कृष्ट फाेटाेग्राफी करणे हे फाेटाेग्राफरचे काम आहे. लग्नाची फाेटाेग्राफी हा कधीही न संपणारा विषय आहे. कारण वर्षभर कुठे ना कुठे लग्न चालूच असतात.त्यामुळे एक काम उत्तम केलेत तर तुमचे चांगले नाव तयार हाेईल आणि तुमच्याकडे नक्कीच उत्तम कामे येत राहतील.